दहावीच्या परीक्षेत दोघींचा पहिला क्रमांक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 10:17 PM2019-05-06T22:17:09+5:302019-05-06T22:18:01+5:30
अवघ्या ३८ दिवसात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) इयत्ता दहावीचा निकाल सुपरफास्ट पद्धतीने जाहीर केला. शैक्षणिक जीवनातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या या निकालात यंदाही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यशाची परंपरा राखली. विशेष म्हणजे पुसदची नंदिनी भंडारी आणि यवतमाळची संस्कृती हजारे या दोन विद्यार्थिनींनी बाजी मारत जिल्ह्यातून अव्वलस्थान पटकाविले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : अवघ्या ३८ दिवसात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) इयत्ता दहावीचा निकाल सुपरफास्ट पद्धतीने जाहीर केला. शैक्षणिक जीवनातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या या निकालात यंदाही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यशाची परंपरा राखली. विशेष म्हणजे पुसदची नंदिनी भंडारी आणि यवतमाळची संस्कृती हजारे या दोन विद्यार्थिनींनी बाजी मारत जिल्ह्यातून अव्वलस्थान पटकाविले. या दोघींनाही ९८ टक्के गुण मिळाले आहेत. तर दरवर्षीप्रमाणे यवतमाळ पब्लिक स्कूलनेही (वायपीएस) शंभर टक्के निकाल देऊन यशाची परंपरा अखंड ठेवली.
२९ मार्च रोजी सीबीएसई दहावीची परीक्षा संपल्यानंतर निकालाबाबत प्रचंड उत्सुकता होती. पुसद येथील जेट किड्स इंटरनॅशनल स्कूलची नंदिनी नीलेश भंडारी आणि यवतमाळ येथील सेंट अलॉयसिअस शाळेची विद्यार्थिनी संस्कृती संजय हजारे यांनी दहावीत बाजी मारली. तर पांढरकवडा येथील गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलमधील विद्यार्थिनी आभा अमर पाटील हिने ९७.४० टक्के गुणांसह जिल्ह्यातून दुसरा क्रमांक मिळविला. त्याच वेळी यवतमाळ पब्लिक स्कूलच्या नील राम बुटले या विद्यार्थ्याने ९७.२० टक्के गुणांसह जिल्ह्यातून तिसरा क्रमांक पटकाविला आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही दहावीच्या निकालात मुलांपेक्षा मुलींनीच बाजी मारल्याचे स्पष्ट झाले. दुपारी २.३० वाजता सीबीएसईने आॅनलाईन निकाल जाहीर केल्यानंतर विविध शाळांना आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याचा निकाल मिळविताना सायंकाळ झाली.
यंदा वायपीएसमधून १२९ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. यात तब्बल ४९ विद्यार्थ्यांनी ए-वन रँक मिळविली आहे. शाळेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा समितीचे अध्यक्ष किशोर दर्डा, प्राचार्य डॉ. जेकब दास, पर्यवेक्षक अर्चना कढव, रुक्साना बॉम्बेवाला यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले आहे.
यासह स्कूल आॅफ स्कॉलर्स, पोदार इंटरनॅशनल, महर्षी विद्या मंदिर, जवाहर नवोदय विद्यालय, वणी येथील स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूल, पांढरकवडा येथील गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल अशा विविध शाळांनी १०० टक्के निकाल दिला आहे.
नंदिनी आणि संस्कृतीला बनायचेय डॉक्टर
यवतमाळ/पुसद : सीबीएसई दहावीच्या निकालात जिल्ह्यातून अव्वलस्थान पटकावणाऱ्या दोन्ही विद्यार्थिनींनी पुढे वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर होण्याची ईच्छा व्यक्त केली. संस्कृती संजय हजारे म्हणाली, मला वैद्यकीय क्षेत्रात करिअर करायचे आहे. अभ्यासातील सातत्य आणि समजून वाचणे यामुळे चांगले गुण मिळतात. दररोज चार ते पाच तास अभ्यास केल्याचे तिने सांगितले. गणित आणि विज्ञान हे दोन्ही विषय तिच्या आवडीचे असून त्यात तिने १०० पैकी १०० गुण घेतले. संस्कृतीची आई गृहिणी आहे. तर वडील केमिस्ट्रीची शिकवणी घेतात. तर पुसदच्या नंदिनीचे आईवडील डॉक्टर असून ती म्हणते, मलाही यापुढे डॉक्टरच बनायचे आहे. अभ्यासासोबतच मला बॅडमिंटन आणि लॉनटेनिस खेळण्याचाही छंद आहे. खेळामुळे मनाची एकाग्रता वाढत असल्याचे नंदिनीने सांगितले. या दोन्ही विद्यार्थिनींनी आपल्या यशाचे श्रेय आईवडील आणि गुरुजनांना दिले.
केंद्रीय विद्यालयाचे दोन विद्यार्थी नापास
जिल्ह्यातील विविध शाळांनी यंदाही दहावीमध्ये शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली. मात्र यवतमाळातील केंद्रीय विद्यालयाला हे यश मिळविता आलेले नाही. या शाळेचा ९५ टक्के निकाल असून ४० पैकी ३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर दोन विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.
गुणवंतांना आवाहन
दहावीच्या परीक्षेत ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची छायाचित्रे ‘लोकमत’ प्रसिद्ध करणार आहे. इच्छुकांनी छायाचित्रे लोकमत कार्यालयात आणून द्यावी.
शाळानिहाय टॉपर विद्यार्थी
नंदिनी भंडारी (९८) जेट किड्स इंटरनॅशनल स्कूल, पुसद
संस्कृती हजारे (९८) सेंट अलॉयसिअस, यवतमाळ
आभा पाटील (९७.०४) गुरुकूल इंग्लीश मीडियम स्कूल, पांढरकवडा
नील बुटले (९७.२०) यवतमाळ पब्लिक स्कूल, यवतमाळ
ओम सावळकर (९६.८४) स्कूल आॅफ स्कॉलर्स, यवतमाळ
कुणाल साबळे (९६.८४) स्कूल आॅफ स्कॉलर्स, यवतमाळ
रोहिणी मुनेश्वर (९६.८०) जवाहर नवोदय विद्यालय, बेलोरा
पार्थ काकरवार (९६) स्वर्णलिला इंटरनॅशनल स्कूल, वणी
मेहदिया खान (९६) जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूल, यवतमाळ
श्रावणी देशपांडे (९४) पोदार इंटरनॅशनल स्कूल, यवतमाळ
लोकेश्वरी पुस्तोडे (९४) मॅक्रून स्कूल, वणी
सानिका चोरे (९२.८) केंद्रीय विद्यालय, यवतमाळ
प्रांजली सुभाष कारमोरे (९३.२) डीएव्ही पब्लिक स्कूल, वणी