ग्लासभर दारुसाठी दोघांनी घेतला ‘बाक्या’चा जीव
By Admin | Published: February 26, 2017 01:14 AM2017-02-26T01:14:06+5:302017-02-26T01:14:06+5:30
व्यसनासाठी माणूस बरेचदा लाचार होतो तर कधी तो राक्षसी वृत्तीने वावरतो. गुन्हेगारी जगतात पदार्पण करू पाहणाऱ्या दोन युवकांनी ग्लासभर दारूसाठी थेट एकाला चाकुने भोसकून काढले.
व्यसनासाठी माणूस बरेचदा लाचार होतो तर कधी तो राक्षसी वृत्तीने वावरतो. गुन्हेगारी जगतात पदार्पण करू पाहणाऱ्या दोन युवकांनी ग्लासभर दारूसाठी थेट एकाला चाकुने भोसकून काढले. गुन्हेगारीपासून परावृत्त होत असलेल्या सेवानिवृत्त पोलीस जमादाराच्या मुलाचा केवळ व्यसनाधीनतेने बळी घेतला. ‘बाक्या’नेही कधीकाळी स्वत: भोवती वलय निर्माण केले होते. मात्र त्याने लवकरच या धोकादायक जगतापासून स्वत:ला अलिप्त केले. या दरम्यानच्या काळात जडलेले व्यसन ‘बाक्या’ला स्वस्थ बसू देत नव्हते. सायंकाळ झाले की त्याची पावले दारु गुत्त्याकडे वळायची. येथेच त्याचा घात झाला. किरकोळ वादातून ’बाक्या’ला
जीव गमवावा लागला.
गुन्हेगारीची सुरूवातचही व्यसनाधिनतेतून होते. किशोरवयात जडलेले व्यसन भवितव्य नेस्तनाबूत करते. चांगल्या कुटुंबातील मुलांचे शालेय अथवा महाविद्यालयीन जीवनात पडलेले वाकडे पाऊल वेळीच वळणावर आले नाही तर त्याचे परिणाम संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात. याचा प्रभाव सामाजिक स्वाथ्यावरही पडतो. किरकोळ वाद गंभीर स्वरूप धारण करतात. सुरूवातीला चोरून-लपून केले जाणारे व्यसन नंतर राजरोसपणे जोपासले जाते. व्यसनाचा अजगरी विळखा पडताच तो युवक सामाजिक भान हरपून बसतो. दिवस -रात्र नशेच्या अंमलात आपल्याच दुनियेत वावरताना दिसतो. चांगले-वाईट याचे भान राहात नाही. याचा प्रत्यय वडगाव परिसरातील वडारवाडीत दारु गुत्त्यावरील खुनातून आला.
सेवानिवृत्त पोलीस जामादाराचा मुलगा बाक्या उर्फ स्वप्नील अंबादास ढाकरगे (२२) रा. नेताजी नगर असे या घटनेतील मृत युवकाचे नाव आहे. स्वप्नील हा काही वर्षांपूर्वी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या टोळक्यांच्या संपर्कात होता. मात्र येथील वास्तवाचे भान आल्यानंतर त्याने त्यांच्यापासून फारकत घेतली. दरम्यानच्या काळात जडलेले व्यसन त्याला सोडता आले नाही. याच व्यसनातून तो ४ फेब्रुवारीला रात्री ८ वाजताच्या सुमारास वडारवाडी येथे दारुगुत्त्यावर पोहोचला. त्याची येथे नेहमीच ये-जा राहात होती. याच कालावधीत आर्णी मार्गावर स्वत:ची दहशत निर्माण करू पाहणारा गौऱ्या उर्फ गौरव सुभाष मानेकर (२५) रा. आर्णी रोड हा त्याचा सहकारी आशीष प्रभाकर गजभिये रा. राऊत नगर या आॅटोचालकाला घेऊन दारुगुत्त्यावर पोहोचला. तेथे या दोघांचा दारु पिण्यावरून बाक्याशी वाद झाला. बाक्याने गौरवच्या ग्लासाला लाथ मारली. दारुचा भरलेला प्याला सांडलेला पाहून गौरवचा राग अनावर झाला. त्याने बाक्याला तेथेच मारहाण करणे सुरू केले. कशीबशी सुटका करून बाक्या गुत्त्याबाहेर पडला. तेव्हा मागून आलेल्या गौरवने बाक्याच्या पार्श्वभागावर चाकुने वार केले. नंतर घटनास्थळावरून पळ काढला.
याच परिसरात राहणाऱ्या त्याच्या नातेवाईकाच्या दृष्टीस तो पडला. मात्र, तो पर्यंत बराच उशीर झाला होता. प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने बाक्याचा मृत्यू झाल्याचे शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी घोषीत केले. या प्रकरणी संगीता रवींद्र वानखेडे (४०) यांच्या तक्रारीवरून वडगाव रोड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळावर मिळालेल्या माहितीवरून सहाय्यक निरीक्षक सारंग मिराशी यांनी तपास सुरू केला. सुरूवातीला आरोपी पसार झालेल्या आॅटोरिक्षाचा त्यांनी माग काढला. तो आॅटोरिक्षा आशीष प्रभाकर गजभीये रा. राऊत नगर याचा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी तातडीने आशीषला आॅटोसह अटक केली. त्यानंतर पहाटे ५ वाजताच्या सुमारास मुख्य आरोपी गौरव मानेकर याला जिल्हा परिषद परिसरातून अटक केली. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला चाकुही जप्त करण्यात आला. गौरव मानेकर हा पोलीस दफ्तरी कुख्यात गुन्हेगार असल्याची नोंद आहे. बरेच दिवसापासून पोलिसांचा त्याच्यावर वॉच होता. गौरव एखाद्याचा तरी खून नक्कीच करणार असा संशय पोलिसांना होता. त्यामुळेच वारंवार त्याची अंग झडती घेतली जात होती. घटनेच्या काही आठवड्यापूर्वी घातक शस्त्रासह त्याला अटकही करण्यात आली होती. या तपासात पोलीस कर्मचारी नीलेश राठोड, आशीष चौबे, रावसाहेब शेंडे, सुरेश मेश्राम यांनी सहभाग घेतला.