बारावी परीक्षेच्या कामावर बहिष्कार; बिनपगारी शिक्षक आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 01:30 PM2020-01-18T13:30:18+5:302020-01-18T13:30:44+5:30
गेल्या २० वर्षांपासून बिनपगारी काम करणाऱ्या शिक्षकांनी आता अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला असून तोंडावर आलेल्या बारावीच्या परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गेल्या २० वर्षांपासून बिनपगारी काम करणाऱ्या शिक्षकांनी आता अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला असून तोंडावर आलेल्या बारावीच्या परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, राज्यभरातील विनाअनुदानित शिक्षक एकवटून गुरूवारी शिक्षण मंडळाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढणार आहेत.
कायम विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालये आणि उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये हजारो शिक्षक गेल्या २० वर्षांपासून एकही पैसा न घेता काम करीत आहेत. मावळत्या काळात युती शासनाने २० टक्के अनुदानाचे आश्वासन या शिक्षकांना दिले होते. मात्र महाविकास आघाडी सरकारने हिवाळी अधिवेशनात तोंडाला पाने पुसल्यानंतर आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात वेतन तरतूद होण्याची ग्वाही दिली आहे. परंतु, त्यासाठी ५८ कॉलममध्ये शाळांकडून माहिती मागविण्यात आली आहे. ती माहिती शाळांनी दिल्यावरही प्रशासकीय उदासीनतेमुळे या फाईल मंत्रालयापर्यंत पोहोचलेल्या नाहीत. त्यामुळे शिक्षक संतापलेले आहेत.
प्रशासनाला ताळ्यावर आणण्यासाठी आता महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय कृती समितीने बारावीच्या परीक्षेच्या संपूर्ण कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. २३ जानेवारीला शिक्षण मंडळाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. तर २७ जानेवारीपासून मुंबईत आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले जाणार आहे.
ऐन परीक्षेच्या तोंडावर शाळा बंद
बारावीच्या परीक्षा आता तोंडावर आल्या आहेत. मात्र त्याचवेळी शिक्षक २७ जानेवारीपासून मुंबईत बेमुदत धरणे आंदोलन करणार आहे. हे निर्वाणीचे आंदोलन म्हणून विनाअनुदानित शाळेतील सर्वच शिक्षक सहभागी होण्याची शक्यता आहे. शिवाय, विविध शिक्षक संघटनांनी या आंदोलनाला सक्रीय पाठींबा दर्शविला आहे. त्यामुळे ऐन परीक्षेच्या काळात शाळा बंद राहणार असल्याने विद्यार्थ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे.