समतेसाठी धावली मुले-मुली
By admin | Published: April 16, 2017 01:08 AM2017-04-16T01:08:33+5:302017-04-16T01:08:33+5:30
सामाजिक एकता आणि शांततेचा संदेश देण्यासाठी समता पर्व प्रतिष्ठानच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित...
समता दौड : आशुतोष नस्करी, रिना मेश्राम अव्वल, शांततेचा संदेश
यवतमाळ : सामाजिक एकता आणि शांततेचा संदेश देण्यासाठी समता पर्व प्रतिष्ठानच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘समता दौड-२०१७’ स्पर्धेत जिल्ह्यातील शेकडो मुला-मुलींनी समतेसाठी धाव घेवून डॉ. आंबेडकर यांना वंदन केले. या स्पर्धेत मुलांच्या गटात आशुतोष नस्करी, तर मुलींच्या गटात रिता मेश्राम यांनी अव्वल स्थान पटकाविले.
समता मैदान येथून स्पर्धेला प्रारंभ झाला. माध्यमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी, समता पर्व प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोर भगत, राज्य मल्लखांब संघटनेचे अध्यक्ष प्रा.डॉ. सुभाष डोंगरे, राज्य क्रीडा मार्गदर्शक सचिंद्र मिलमिले, अमोल बोदडे, समता पर्व समन्वयक अंकुश वाकडे यांच्या उपस्थितीत स्पर्धेला हिरवी झेंडी दाखविण्यात आली.
१६ वर्षाखालील मुला-मुलींसाठीच्या या स्पर्धेत विविध शाळेतील मुलांच्या गटात २००, तर मुलींच्या गटात १७५ स्पर्धकांनी सहभाग घेतला. मुलांच्या पाच किलोमीटर अंतर स्पर्धेत लोकनायक बापूजी अणे विद्यालयाच्या खेळाडूंनी वर्चस्व गाजवित प्रथम तीन क्रमांक पटकाविले. आशुतोष नस्करी याने प्रथम, तर अजिंक्य गायकवाड, सोनल वानखडे यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थान प्राप्त केले. सेंट अलॉयसिअसच्या केदार ठाकरे याला प्रोत्साहन बक्षीस देण्यात आले.
मुलींच्या तीन किलोमीटर स्पर्धेत नगरपरिषद शाळा क्र.१२ ची रिना मेश्राम हिने प्रथम स्थान प्राप्त केले. अभ्यंकर कन्या शाळेची ऋतुजा नवरे हिला दुसरे, तर नगरपरिषद शाळा क्र.१२ ची गुंजा खिची हिला तिसरे स्थान मिळाले. सुहानी चनेकर हिला प्रोत्साहन बक्षीस मिळाले. विजेत्यांना रोख आणि प्रमाणपत्र देण्यात आले.
बसस्टँड चौकात बक्षीस वितरण कार्यक्रम घेण्यात आला. समता पर्वाचे अध्यक्ष किशोर भगत, शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी, समता पर्वचे कार्याध्यक्ष प्रकाश भस्मे, इंजिनिअर दीपक नगराळे, समन्वयक अंकुश वाकडे आदी उपस्थित होते.
स्पर्धेचे धावते समालोचन व संचालन प्रा. अनंत पांडे यांनी केले. पंच म्हणून रमाकांत कौशिक, प्रा. प्रेमेंद्र रामपुरकर, अजय मिरकुटे, प्राचार्य संदीप चावक, अविनाश जोशी, जितेंद्र सातपुते, सचिन भेंडे, पीयूष भुरचंडी, संजय बट्टावार, मनोज येंडे, संजय कोल्हे, किरण फुलझेले, अमित गुरव, पंकज शेलोटकर, अभिजित पवार यांनी काम केले. स्पर्धा संयोजक म्हणून विजय रंगारी, एम.एन. मीर, प्रा. नीलेश भगत, जिल्हा अॅथलेटिक्स संघटना व शारीरिक शिक्षक संघटना यांनी जबाबदारी सांभाळली. (क्रीडा प्रतिनिधी)