वटफळीतील बीपीएल कुटुंब घरकूल लाभापासून वंचित
By admin | Published: June 27, 2017 01:28 AM2017-06-27T01:28:00+5:302017-06-27T01:28:00+5:30
स्वमालकीची जागा असूनही केवळ ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभारामुळे वटफळी येथील दारिद्र्यरेषेखालील कुटुंब घरकुलाच्या लाभापासून वंचित आहे.
ग्रामपंचायतीची आडकाठी : जागेविषयी अनेक प्रश्न
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : स्वमालकीची जागा असूनही केवळ ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभारामुळे वटफळी येथील दारिद्र्यरेषेखालील कुटुंब घरकुलाच्या लाभापासून वंचित आहे. यासंदर्भात लोकशाही दिनात दाखल झालेल्या तक्रारीवरही कारवाई झाली नाही. त्यामुळे या वंचित नागरिकांनी न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केली आहे.
वटफळी येथे गट क्र.१४२ मध्ये मागील ४० वर्षांपासून अनेक कुटुंब वास्तव्याला आहे. ग्रामपंचायतीच्या दप्तरी रहिवाशांची स्वत:च्या नावे जागा असल्याची नोंदही आहे. परंतु ग्रामपंचायतीने काही वर्षांपासून गट क्र.१४२ ही अतिक्रमणात असून तेथे घरकूल देता येत नाही, असा आदेश काढला. वास्तविक या भागामध्ये यापूर्वी चार टप्प्यात घरकूल झाले आहे. आता मात्र सरपंच, सचिव आणि काही सदस्यांकडून ही जागा महसूल विभागाच्या हद्दीत येत असल्याचे सांगितले जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाची जागा असल्याचेही कधीकधी सांगितले जाते. नेमकी ही जागा कुणाची असा प्रश्न उपस्थित होत असतानाच गरजू मात्र घरकुलाच्या लाभापासून वंचित आहे.
यासंदर्भात नागरिकांनी वरिष्ठांकडे तक्रारी केल्या. परंतु कुणीही दखल घेतली नाही. ग्रामपंचायतीला त्यांच्याकडून पाठबळ मिळत असल्याचा आरोप आहे. याप्रकरणी आता ५० नागरिकांनी न्यायालयात जाण्याची तयारी दर्शविली आहे.