मातंग व चर्मकार समाजाच्या प्रश्नांवर मंथन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 11:30 PM2017-12-01T23:30:18+5:302017-12-01T23:31:07+5:30

येथील आझाद मैदानात सुरू असलेल्या स्मृती पर्वात गुरुवारी झालेल्या व्याख्यानात मातंग आणि चर्मकार समाजाच्या प्रश्नांवर मंथन करण्यात आले.

Brainstorm on the questions of Matang and Charmakar Samaj | मातंग व चर्मकार समाजाच्या प्रश्नांवर मंथन

मातंग व चर्मकार समाजाच्या प्रश्नांवर मंथन

googlenewsNext
ठळक मुद्देयेथील आझाद मैदानात सुरू असलेल्या स्मृती पर्वात गुरुवारी झालेल्या व्याख्यानात मातंग आणि चर्मकार समाजाच्या प्रश्नांवर मंथन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील आझाद मैदानात सुरू असलेल्या स्मृती पर्वात गुरुवारी झालेल्या व्याख्यानात मातंग आणि चर्मकार समाजाच्या प्रश्नांवर मंथन करण्यात आले. गुरु रविदास विचार मंच आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समिती यांच्या संयोजनात कार्यक्रम पार पडले.
अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे संस्थापक चंद्रप्रकाश देगलुरकर यांचे ‘चर्मकार समाजावर होणारे प्रस्थापितांचे हल्ले आणि समाजबांधवांची जबाबदारी व भूमिका’ या विषयावर व्याख्यान झाले. चर्मकार, मातंग तसेच बौद्धांवर होणारे हल्ले हे भारतीय संविधानाला आव्हान देणारे आहे. दरदिवशी या अन्याय, अत्याचाराच्या घटना घडत आहे. हा सर्व प्रकार समाजात भीतीचे वातावरण निर्माण करणारा आहे. सर्व हल्ले सरकार पुरस्कृत आहे, असा आरोप त्यांनी केला.
केंद्रात एकट्या चांभार समाजाचे सात मंत्री, महाराष्ट्रात तीन खासदार आणि १६ आमदार आहेत. अन्याय अत्याचाराबद्दल एकानेही सभागृहात आवाज उठविला नाही. ही मंडळी कुणाचे प्रतिनिधित्व करीत आहे, हे त्यांनाही कळत नाही आणि समाजालाही कळायला मार्ग नाही, अशा आमच्या मागासवर्गीय लोकप्रतिनिधींची अवस्था झालेली आहे. जोपर्यंत भारतीय संविधानाची प्रभावीपणे अंमलबजावणी होणार नाही तोपर्यंत देशात कायद्याचे राज्य प्रस्थापित होणार नाही. या सर्व बाबींचा एकसंघपणे आपल्याला लढा उभारण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला.
यावेळी अध्यक्षस्थानी एस.एम. बांगडे होते. आर.एन. चंदनकर, संध्या बांगडे, कमल खंडारे, मीनाक्षी सावळकर, संजय तरवरे, विजय मालखेडे, रवी बच्छराज, लोकेश मालखेडे, ज्ञानेश्वर गोरे, विलास काळे, संजय बोरकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
अण्णाभाऊ साठे स्मारक समिती
अण्णाभाऊ साठे स्मारक समितीच्या संयोजनात ‘मातंग समाजाचे अस्तित्व व अस्मिता व फुले-आंबेडकरी विचारधारा’ या विषयावर प्राचार्य तथा महाराष्ट्र शासनाच्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चरित्रे, साधने व प्रकाशन समितीचे सदस्य डॉ. अ.श्रृ. जाधव यांचे व्याख्यान झाले.
शिक्षणाची कास धरल्याशिवाय मातंग समाजाची प्रगती शक्य नाही. आपण लहुजी साळवे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचे वारस असलो तरी आपले अस्तित्व आणि अस्मिता केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच आहे, तोच आपला स्वाभिमान आहे, असे ते म्हणाले. समाजात असलेले दारिद्र्य, अज्ञान, व्यसनांवर त्यांनी विवेचन केले.
अध्यक्षस्थानी साहेबराव खडसे होते. कांता कांबळे, संगीता रणखांब, इंदू कांबळे, संजय हनुवते, मनोज रणखांब, पंडित वानखेडे, प्रा. बाळकृष्ण सरकटे आदी विचारपिठावर उपस्थित होते. प्रारंभी स्मारक समितीच्यावतीने सुगम संगीताचा कार्यक्रम सादर झाला.
गजानन वानखडे, गुलशन शेडमाके, भूजंग केवले, अश्विनी वानखडे, अखिलेश गुल्हाने, रोहित वानखडे, गजानन जडेकर, श्रद्धा वानखडे, पवन बारस्कर यांनी अण्णाभाऊ साठे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित गीते गायली. प्रसंगी ज्ञानेश्वर गोरे, संजय बोरकर आदी उपस्थित होते.

रविवारी आरक्षणावर व्याख्यान
स्मृती पर्वात रविवार, ३ डिसेंबर रोजी विमुक्त घुमंतू, बारा बलुतेदार, ओबीसी, अती पिछडा सेवा संघाच्या संयोजनात रात्री ८ वाजता व्याख्यान होत आहे. आरक्षण, फुले-शाहू-आंबेडकर आणि एल.आर. नाईक पॅटर्न, केंद्रीय २७ टक्केचे विभाजन, सामाजिक न्यायाचे दुसरे पर्व असा व्याख्यानाचा विषय आहे. बीसी युनायटेड फ्रंट तथा अखिल भारतीय शाहू महासभेचे वर्किंग प्रेसिडेंट पी. रामकृष्णय्या यांच्या अध्यक्षतेत व्याख्यान होईल. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन राष्ट्रीय बंजारा क्रांतीदलाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाबूसिंग कडेल यांनी केले आहे.
तेली समाज महासंघ
महात्मा जोतिराव फुले-डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पर्वात शनिवार, २ डिसेंबर रोजी तेली समाज महासंघाच्या संयोजनात सायंकाळी ६ वाजता व्याख्यान होत आहे. ‘फुले-शाहू-आंबेडकर विचारातून ओबीसीची विकास प्रक्रिया व सामाजिक संघटन’ असा व्याख्यानाचा विषय आहे. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष संध्याताई सव्वालाखे यांच्या अध्यक्षतेत हा कार्यक्रम होईल.
 

Web Title: Brainstorm on the questions of Matang and Charmakar Samaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.