धाडसी सानिका ९८ टक्के गुणांनी यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 05:00 AM2020-07-30T05:00:00+5:302020-07-30T05:00:21+5:30
हिवरी येथील सुधाकर गोविंदराव पवार (४५) या शेतकऱ्याने आर्थिक विवंचनेतून तीन महिन्यांपूर्वी विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली होती. त्यावेळी त्यांची मुलगी सानिकाची दहाव्या वर्गाची परीक्षा सुरू होती. वडिलांचा मृतदेह शवागारात असताना आभाळाएवढे दु:ख पचवत ती संस्कृत विषयाचा पेपर सोडविण्यासाठी गेली होती. मुलीने डॉक्टर व्हावे ही सुधाकर पवार यांची इच्छा होती.
शिवानंद लोहिया ।
लोकमत न्यूज नेटवर्क
हिवरी : वडिलांचा मृतदेह शवागारात असताना पेपर सोडविणाऱ्या धाडसी सानिकाने ९७.६० टक्के गुण घेत यश संपादन केले. विशेष म्हणजे, या दु:खद घटनेच्या दिवशी सोडविलेल्या संस्कृत विषयात तिला १०० पैकी १०० गुण प्राप्त झाले आहे. मुलगी डॉक्टर व्हावी, हे वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने सानिकाची वाटचाल सुरू झाली आहे.
हिवरी येथील सुधाकर गोविंदराव पवार (४५) या शेतकऱ्याने आर्थिक विवंचनेतून तीन महिन्यांपूर्वी विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली होती. त्यावेळी त्यांची मुलगी सानिकाची दहाव्या वर्गाची परीक्षा सुरू होती. वडिलांचा मृतदेह शवागारात असताना आभाळाएवढे दु:ख पचवत ती संस्कृत विषयाचा पेपर सोडविण्यासाठी गेली होती. मुलीने डॉक्टर व्हावे ही सुधाकर पवार यांची इच्छा होती. त्यादृष्टीने सानिकाने तयारी सुरू केली होती. तिच्या या प्रयत्नाला यश आले. ९७.६० टक्के गुण घेत तिने यश मिळविले. दुपारी निकाल घोषित होताच मिळालेल्या यशाने तिचे अश्रू अनावर झाले.
वडिलांचे स्वप्न साकारणार
मी डॉक्टर व्हावे, अशी वडिलांची इच्छा होती. परिस्थिती चांगली नसली तरी मला शिकविण्याची पूर्ण तयारी होती. ते जेथे कुठे असतील तेथून मला आशीर्वाद देत असेल. मला डॉक्टर करण्याचे त्यांचे स्वप्न साकारण्यासाठी जीवाचे रान करण्याची तयारी असल्याचे सानिकाने सांगितले.