‘अमृत’साठी फोडलेल्या रस्त्यांवर ब्रेकडाऊन वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 11:48 PM2018-07-13T23:48:13+5:302018-07-13T23:49:21+5:30
शहरासाठी ३०२ कोटींच्या अमृत योजनेचे काम हाती घेण्यात आले आहे. सर्वत्र पाईप लाईन टाकण्यासाठी झालेल्या खोदकामाच्या ठिकाणी चिखल आणि मोठमोठे खड्डे पडलेले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरासाठी ३०२ कोटींच्या अमृत योजनेचे काम हाती घेण्यात आले आहे. सर्वत्र पाईप लाईन टाकण्यासाठी झालेल्या खोदकामाच्या ठिकाणी चिखल आणि मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. त्यामध्ये वाहन घसरून किरकोळ अपघात होत आहे, तर काही ठिकाणी वाहन फसून चक्काजाम होत आहे.
शहराच्या सर्वच भागात ही परिस्थिती निर्माण झाली आहे. खोदकाम झालेल्या ठिकाणी योग्यरित्या माती टाकली गेली नाही. थातुरमातूर काम करण्यात आले. पावसाच्या पाण्यामुळे अशा ठिकाणी नाल्या तयार झाल्या आहेत. अर्धा फूटपर्यंत खोल खड्डे झाल्याने विविध प्रकारची वाहने त्यात फसत आहे. आठवडी बाजार परिसराच्या राणी झाँशी चौकात खोदलेल्या नालीत दररोज वाहन फसून वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रकार घडत आहे. चर्च रोड परिसरातून मार्ग काढण्यासाठीही जागा शिल्लक राहिली नाही. शिवाय गोदणी रोड, उमरसरा, भोसा, वाघापूर, लोहारा, वडगाव आदी भागातही हीच परिस्थिती आहे. हनुमान आखाडा ते चांदणी चौक रस्त्यावरील मातीचे ढीग कायम आहेत.
हिंदी हायस्कूल ते वीर वामनराव चौक रस्ता खेड्यालाही लाजविणारा झालेला आहे. आयुर्वेद महाविद्यालय परिसराचीही हिच अवस्था आहे. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी रस्त्याखालून टाकलेले पाईप खोदकाम करताना काढून टाकले. आता पाणी वाहून जाण्यासाठी जागा नसल्याने लोकांच्या घराचा परिसर तुडुंब भरलेला आहे. घरात पाणी शिरायचे तेवढे बाकी आहे.
ग्रामीण भागातही गंभीर प्रश्न
आसेगाव(देवी) : बेंबळा प्रकल्पासाठी ग्रामीण भागातून पाईप लाईन टाकण्यात आली. रस्त्यावर सहा ते सात फुटांचा खड्डा खोदण्यात आला. या ठिकाणाची योग्यरित्या दबाई केली गेली नाही. पावसाच्या पाण्याने तयार झालेल्या खड्ड्यांमध्ये वाहन फसण्याचे प्रकार वाढले आहे. किरकोळ अपघातही नित्याची बाब झाली आहे. राणीअमरावती, गळव्हा, भिसनी हे रस्ते बेंबळाच्या पाईप लाईनसाठी फोडण्यात आले आहे.