प्रीमिअर लीग कबड्डी स्पर्धेत तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 11:29 PM2018-01-21T23:29:39+5:302018-01-21T23:29:49+5:30
प्रिमीअर लीग कबड्डी स्पर्धेत आयोजकांच्या ढिसाळ नियोजनाने संतप्त झालेल्या खेळाडूंनी तोडफोड केल्याची घटना येथील नेहरू स्टेडीअमवर रविवारी घडली. खेळाडूंचा संताप पाहून आयोजक पसार झालेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : प्रिमीअर लीग कबड्डी स्पर्धेत आयोजकांच्या ढिसाळ नियोजनाने संतप्त झालेल्या खेळाडूंनी तोडफोड केल्याची घटना येथील नेहरू स्टेडीअमवर रविवारी घडली. खेळाडूंचा संताप पाहून आयोजक पसार झालेत.
रविवारपासून २४ जानेवारीपर्यंत बालाजी स्पोर्ट असोसिएशनतर्फे जिल्हास्तरीय वायपीएल कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र दुसºयाच दिवशी आयोजकांचे नियोजन कोलडमडल्याने खेळाडूंनी संताप व्यक्त करीत तोडफोड केली. गाव पातळीपासून जिल्हास्तरापर्यंत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. नेहरू स्टेडीअमवर २० जानेवारीपासून स्पर्धेला प्रारंभ झाला. स्पर्धेसाठी येणाºया खेळाडूंच्या भोजन आणि निवासाची व्यवस्था आयोजकांकडे होती. निवड झालेल्या स्पर्धकांना ट्रॅक सूट देण्याची ग्वाही देण्यात आली होती. त्यासाठी आयोजकांनी स्पर्धकांकडून बक्कळ वसुली केली. मात्र स्पर्धा सुरू झाली तरीही ट्रॅक सूट पोहोचले नाही. मोजक्याच खेळाडूंना कीट मिळाली. तीसुद्धा दर्जेदार नसल्याचा आरोप स्पर्धकांनी केला.
यामुळे रविवारी खेळाडंूनी प्रचंड संताप व्यक्त केला. स्पर्धास्थळी तोडफोड केली. आयोजकांवर विविध आरोप केले. विशेष म्हणजे या स्पर्धेत सहभागी खेळाडूंना प्रो-कबड्डी स्पर्धेत सहभाग घेण्याची संधी मिळणार असल्याचे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात पहिल्या दिवशीच नियोजन कोलमडले. भोजन आणि निवासाची व्यवस्था झाली नाही. यामुळे स्पर्धक संतापले. त्यांनी रविवारी तोडफोड करीत खुर्च्यांची फेकाफेक केली. शटर तोडले. तेथे उभारलेला मंडपही फाडून टाकला.
या प्रकरणाची काही खेळाडूंनी थेट पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. मात्र वृत्तलिहिस्तोवर कुणावरही गुन्हा दाखल झाला नव्हता.