देशासाठी निधडी छाती... प्राणही घेऊ हाती!

By admin | Published: January 7, 2017 12:31 AM2017-01-07T00:31:40+5:302017-01-07T00:31:40+5:30

एवढा एकच शब्द जाती-धर्मात दुभंगलेल्या नागरिकांना एका सुत्रात बांधण्यासाठी पुरेसा ठरतो.

Breath for the country ... take life for us! | देशासाठी निधडी छाती... प्राणही घेऊ हाती!

देशासाठी निधडी छाती... प्राणही घेऊ हाती!

Next

देशप्रेम... एवढा एकच शब्द जाती-धर्मात दुभंगलेल्या नागरिकांना एका सुत्रात बांधण्यासाठी पुरेसा ठरतो. सैनिकांच्या छावण्यांमध्ये शिस्तीसोबतच हा सामाजिक सौहार्दही शिगोशिग पाहायला मिळतो. या देखावा पाहण्यासाठी सीमेवरच गेले पाहिजे असे नाही. नागरी भागात होणाऱ्या सैन्यभरतीच्या ठिकाणीही हे चित्र दिसते. गुरुवारी मध्यरात्रीपासून यवतमाळात सुरू झालेली सैन्यभरतीही त्यातलीच कडी. रात्री दीड वाजता भयंकर थंडी, त्यात विशीतले तरुण निधडी छाती उघडी करून शारीरिक चाचण्यांसाठी सज्ज... छाती, उंची मोजून झाल्यावर उंच उडी, धावण्याच्या कसोट्यांवरही प्राण पणास लावून खरे उतरले. मनात महत्त्वाकांक्षेचा दारूगोळा अन् डोळ्यापुढे एकच लक्ष्य, देशसेवा करायची आहे!

यवतमाळ : विदर्भस्तरीय सैन्य भरतीसाठी यावेळी यवतमाळ शहराला लष्कराकडून मान देण्यात आला आहे. येथील जवाहरलाल नेहरू जिल्हा क्रीडा संकुलात ही भरती प्रक्रिया ७ जानेवारीपासून सुरू झाली आहे. येत्या १७ जानेवारीपर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे. प्रत्यक्षात गुरुवारी मध्यरात्रीपासूनच प्रक्रियेला सुरूवात झाली. त्यासाठी बुधवारी सायंकाळपासूनच गोधणी रोडचा परिसर तरुणांच्या जथ्थ्यांनी गजबजून गेला. रात्री दीड वाजता या तरुण उमेदवारांच्या शैक्षणिक कागदपत्रांची तपासणी सुरू झाली. नंतर होणाऱ्या शारीरिक चाचण्यांसाठी विद्यार्थ्यांचे नियोजनबद्ध गट तयार करण्यात आले. सकाळ होता-होता ही शारीरिक चाचणी सुरू झाली. एका रांगेत शिस्तबद्ध उभे असलेले तरुण एक-एक करुन पुढे आले. त्यांची उंची मोजण्यात आली. उंची मोजताक्षणी लष्करी अधिकारी जोरात ओरडून त्यांची उंची सांगायचा, दुसरा अधिकारी नोंदवून घ्यायचा. लगेच उमेदवाराचे वजन मोजले गेले. त्यानंतर पाठोपाठ छातीचे माप घेतले गेले. वजनमापात बसलेल्या तरुणांपुढे नंतरचे आव्हान होते उंच उडीचे. ९ फूट खड्ड्यावरून उडी मारण्याचे हे आव्हानही जवान पार करून गेले. त्यानंतर काही क्षणात ‘पुल अप्’करिता रेडी व्हायचे होते. उंच सिंगल बार धरून उमेदवारांना कमीत कमी १० वेळा ‘अप डाउन’ करण्याचा निकष आहे. नुसते १० पुल अप मारणेच पुरेसे नाही तर ते पुल अप कशा पद्धतीने एखादा उमेदवार मारतो, त्यावरही लष्करी अधिकाऱ्यांची करडी नजर आहे. पण बहुतांश नवजवानांनी हा टप्पाही लिलया पार केला. सर्वात महत्त्वाची कसोटी आहे रनिंगची. यात १६०० मीटर (१.६ किलोमीटर) अंतर अवघ्या ५ मिनिट ४० सेकंदात पार करायचे असते. सकाळच्या कडाक्याच्या थंडीत तरुणांनी अत्यंत जोमाने रनिंग केली. या सर्व कसोट्यांमध्ये निवडल्या गेलेल्या तरुणांचे १-२ दिवसानंतर मेडीकल चेकअप केले जाणार आहे. हा झाला पहिला दिवस. अशीच प्रक्रिया १७ जानेवारीपर्यंत चालणार आहे. शारीरिक चाचण्यांमध्ये फिट्ट बसलेल्या तरुणांची यापुढे लेखी परीक्षा होईल आणि त्यानंतर अखिल भारतीय मेरिट लिस्ट तयार केली जाईल, त्यानुसारच त्यांचे सिलेक्शन केले जाणार आहे, अशी माहिती मेजर अश्विनी पांडे यांनी ‘लोकमत’ला दिली.

Web Title: Breath for the country ... take life for us!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.