उन्हाळ्यात बांधलेल्या पुलाला तडे
By Admin | Published: July 21, 2016 12:06 AM2016-07-21T00:06:08+5:302016-07-21T00:06:08+5:30
दोन महिनेही पूर्ण न झालेल्या पुलाला तडे गेल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
रस्ता खचण्याचा धोका : रूंदीकरणाच्या कामात गौडबंगाल
यवतमाळ : दोन महिनेही पूर्ण न झालेल्या पुलाला तडे गेल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. यवतमाळ ते दारव्हा मार्गाच्या रूंदीकरणाचे काम एका खासगी बांधकाम कंपनीला दिले होते. घाटातील हा रस्ता उन्हाळयात पूर्ण करण्यात आला आणि पावसाळयात या रस्त्याला व पुलाला तडे गेले आहे. कुठल्याही क्षणी या मार्गावर अपघात होण्याचा धोका आहे. या गंभीर प्रकाराच्या बाबतीत सार्वजनिक बांधकाम विभाग कुठली भूमिका घेणार आहे, यावरच प्रवाशांच्या जिवित्वाचे गणित विसंबून आहे.
राज्य मार्गाच्या विस्तारीकरणाचे काम खासगी कंत्राटदारांकडे सोपविण्यात आले आहे. टप्प्या-टप्प्याने हे काम पूर्णत्वास नेले जात आहे. यवतमाळ ते दारव्हा मार्गाच्या रुंदीकरणाचे काम एका खासगी कंत्राटदाराला देण्यात आले होते. त्याने उन्हाळयात युध्द पातळीवर काम केले. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी रूंदीकरण करून पूल वाढवायचा होता त्या ठिकाणी प्रचंड निष्काळजीपणा करण्यात आला. यामुळे उन्हाळयात बांधलेला पूल पावसाळयात खचण्याच्या स्थितीत पोहचला आहे. इतकेच नव्हे तर या पुलावरील डांबराला चक्क तडे गेले आहे.
हा प्रकार प्रवाशांच्या लक्षात येऊ नये म्हणून काही दिवसांपूर्वी त्यावर डांबर आणि गिट्टी टाकून तडे लपविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र काही दिवसात आणखी दुसऱ्या बाजूला मोठे तडे गेले आहे. त्यामुळे हा पूल खाली दबला आहे.
यामुळे वाहन चालविताना चांगलीच कसरत करावी लागते. हा पूल कुठल्याही क्षणी खचण्याची आणि मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. या गंभीर प्रकारानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाने या कंत्राटदारावर कुठलीही कारवाई केली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. (शहर वार्ताहर)