नरसापुरात तुटल्या पक्षभेदाच्या श्रृंखला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 12:11 AM2018-04-17T00:11:34+5:302018-04-17T00:11:34+5:30
गावगाड्याच्या राजकारणात पक्षीय नेत्यांमधून विस्तवही जात नाही. वर्चस्वाच्या लढाईत एकमेकांवर कुरघोडी करण्यातच सर्व धन्यता मानतात. मात्र गाव पाणीदार करण्यासाठी याच गावपुढाऱ्यांसह सामान्य ग्रामस्थांनी आता एकमेकांचा हात पकडून खांद्याला-खांदा लावून श्रमदान केल्याचा अनुभाव तालुक्यातील नरसापूर येथे आला.
गजानन अक्कलवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब : गावगाड्याच्या राजकारणात पक्षीय नेत्यांमधून विस्तवही जात नाही. वर्चस्वाच्या लढाईत एकमेकांवर कुरघोडी करण्यातच सर्व धन्यता मानतात. मात्र गाव पाणीदार करण्यासाठी याच गावपुढाऱ्यांसह सामान्य ग्रामस्थांनी आता एकमेकांचा हात पकडून खांद्याला-खांदा लावून श्रमदान केल्याचा अनुभाव तालुक्यातील नरसापूर येथे आला.
नरसापूर येथील ग्राम सुधार समितीतर्फे महाश्रमदान कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. त्यासाठी आमदार प्रा.डॉ. अशोक उईके, माजी आमदार प्रा. वसंत पुरके, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा बाजार समितीचे सभापती प्रवीण देशमुख या परंपरागत विरोधकांनी एकत्र येऊन हातात टिकास, पावडे व टोपले घेत जलसंधारणाचे काम केले. अनेकदा एकमेकांच्या कार्याला विरोध करणाºया या तीन नेत्यांत श्रमदानासाठी झालेली एकी अनेकांना सुखद धक्का देऊन गेली. त्यामुळे गावकरी व बाहेरुन आलेल्या शेकडो लोकांचा उत्साह द्विगुणीत झाला.
श्रमदानामध्ये उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, तहसीलदार रणजित भोसले, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता मनोहर शहारे, चिंतामणी देवस्थानचे अध्यक्ष चंद्रशेखर चांदोरे, वनपरिक्षेत्राधिकारी नितीन वानखडे, तालुका कृषी अधिकारी संजय पाठक, कृषी अधिकारी किशोर अंबरकर, सोनाली चव्हाण, प्राचार्य अविनाश शिर्के, डॉ. विजय कावलकर, प्रा. घनशाम दरणे, नायब तहसीलदार देशपांडे, कहारे, बावणे, उपनगराध्यक्ष मनोज काळे, नगरसेवक राजू पड्डा, अशोक उमरतकर, मुन्ना लाखीयाँ, रुपेश राऊत, अशोक बागडे, अर्चना दवारे, योगेश बोटरे यांच्यासह सर्व विभागातील कर्मचारी व हजारो लोकांचा सहभाग होता.
अनेकांनी केले सहकुटूंब श्रमदान
या महाश्रमदानात प्रवीण देशमुख, उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, तहसीलदार भोसले, वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांसह अनेकांनी सहपरिवार श्रमदान केले. यामुळे लोकांचा उत्साह आणखी वाढला. श्रमदान सुरू असतानाच मसुरी येथे प्रशिक्षणासाठी गेलेले जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांना नरसापूर येथे महाश्रमदानात हजारो नागरिकांनी सहभाग घेतल्याची माहिती देण्यात आली. डॉ. देशमुख यांनी लगेच संदीपकुमार अपार यांच्या भ्रमणध्वनीवरुन उपस्थितांशी हितगूज केले. गावकऱ्यांच्या कार्याची स्तुती केली. विशेष म्हणजे जिल्हाधिकाºयांनी यापूर्वीच शिवारफेरी काढली होती.