भावातील चढ-उताराने वेअर हाऊस ‘हाऊसफुल्ल’
By admin | Published: January 17, 2016 02:24 AM2016-01-17T02:24:53+5:302016-01-17T02:24:53+5:30
दुष्काळी स्थिती पाहता शेतमाल बाजारात येताच दर वाढतील, असा विश्वास शेतकऱ्यांना होता. प्रत्यक्षात तसे घडले नाही. उलट दरात घसरण झाली.
शेतकरी संभ्रमात : सोयाबीन, तुरीची आवक वाढली
यवतमाळ : दुष्काळी स्थिती पाहता शेतमाल बाजारात येताच दर वाढतील, असा विश्वास शेतकऱ्यांना होता. प्रत्यक्षात तसे घडले नाही. उलट दरात घसरण झाली. यामुळे शेतकऱ्यांनी शेतमाल वेअर हाऊसमध्ये टाकला आहे. शेतकऱ्यांपेक्षाही व्यापाऱ्यांनीच येथे अधिक माल ठेवल्याने वेअर हाऊस सध्या हाऊसफुल्ल झाले आहेत.
गतवर्षी जूनमध्ये सोयाबीनचे दर चार हजारांवर पोहोचले आहेत. खरीप हंगामातील सोयाबीन बाजारात येताच सोयाबीनचे दर ३४०० ते ३६०० रूपये क्विंटलपर्यंत उतरले. तुरीचे दर १४ हजार रूपये क्विंटलवर पोहोचले होते. या दरामध्ये घसरण झाली. यामध्ये क्विंटलमागे पाच हजार रूपयांची घट नोंदविली गेली. जुने दर पुन्हा येतील, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी आपली तूर वेअर हाऊसमध्ये ठेवली आहे. यातून सध्याच्या स्थितीत वेअरहाऊस हाऊसफुल्ल झाले आहेत. (शहर वार्ताहर)