भररस्त्यात गोळ्या झाडून डॉक्टरचा निर्घृण खून, पाळत ठेवून साधला नेम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2022 11:43 AM2022-01-12T11:43:58+5:302022-01-12T12:09:45+5:30

आरोपीने डाॅक्टर हनुमंत धर्मकारे यांच्या अगदी जवळ जाऊन गोळ्या झाडल्या. पहिली गोळी त्यांच्या छातीत लागली. त्यानंतर डाॅक्टर जागेवर फिरले. इतर तीन गोळ्या पाठीत लागल्या.

brutal murder of doctor by firing bullets in umarkhed yavatmal | भररस्त्यात गोळ्या झाडून डॉक्टरचा निर्घृण खून, पाळत ठेवून साधला नेम

भररस्त्यात गोळ्या झाडून डॉक्टरचा निर्घृण खून, पाळत ठेवून साधला नेम

googlenewsNext
ठळक मुद्देवर्मी घातली गोळी मदतीला धावणाऱ्या नागरिकांवरही रोखली बंदूक

यवतमाळ : उमरखेड शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच भररस्त्यात गोळ्या झाडून खून केल्याची घटना घडली आहे. हल्लेखोर तरुणाने डाॅक्टरवर पाळत ठेवूनच हा हल्ला केला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. हल्लेखोर हा सराईत असून, त्याने पहिली गोळी थेट डाॅक्टरच्या छातीत मारली. मंगळवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेने उमरखेडवासीय पुरते हादरले आहेत.

घटनेच्या प्रत्यक्षदर्शींच्या माहितीवरून आरोपी हा सराईत असल्याचे दिसून येते. आरोपीने डाॅक्टर हनुमंत धर्मकारे यांच्या अगदी जवळ जाऊन गोळ्या झाडल्या. पहिली गोळी त्यांच्या छातीत लागली. त्यानंतर डाॅक्टर जागेवर फिरले. इतर तीन गोळ्या पाठीत लागल्या. चार गोळ्या झाडत असताना आरोपीवर उपस्थित नागरिकांनी दगडफेक केली. मात्र, तो जागेवरून हलला नाही. उलट त्याने नागरिकांकडे बंदूक रोखत दुचाकीवर स्वार होऊन पोबारा केला.

डाॅक्टरच्या जिवाचा दुश्मन कोण व कशासाठी झाला, हा प्रश्न प्रत्येकाला सतावत आहे. डाॅ. हनुमंत धर्मकारे हे सात वर्षांपूर्वी नांदेडहून उमरखेडमध्ये स्थायिक झाले. येथील उपजिल्हा रुग्णालयात बालरोग तज्ज्ञ म्हणून त्यांनी सेवा दिली आहे. त्यानंतर स्वत:चे खासगी रुग्णालयही सुरू केले होते. धर्मकारे यांच्या पत्नीसुद्धा दंतचिकित्सा तज्ज्ञ आहेत. त्यांचा लहान भाऊ डाॅक्टर आहे. बहीणसुद्धा डाॅक्टर आहे. या उच्चभ्रू कुटुंबाशी वैरभाव कशावरून निर्माण झाला याचा शोध पोलीस घेत आहेत. घटनास्थळाला जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक डाॅ. खंडेराव धरणे, माजी गृहराज्यमंत्री रणजित पाटील, आमदार नामदेव ससाने, माजी आमदार विजय खडसे, भाजप जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी भेट दिली.

यवतमाळ, पुसदनंतर उमरखेडमध्ये गोळीबार

जिल्हा गेल्या काही दिवसांपासून संवेदनशील बनला आहे. गुन्हेगार पारंपरिक शस्त्रांचा वापर करण्याऐवजी थेट गोळीबार करण्यावर उतरले आहेत. यवतमाळात रेती तस्करीच्या वादातून भरचाैकात गोळीबार झाला. त्यानंतर पुसदमध्ये दोन टोळ्यांमध्ये संघर्ष पेटला. भरदिवसा रस्त्यावरच गोळ्या झाडून युवकाला ठार केले. आता उमरखेडमध्ये डाॅक्टरला सर्वांसमक्ष गोळी झाडून ठार करण्यात आले. मोठ्या प्रमाणात अग्निशस्त्र जिल्ह्यात येत आहेत. यावर पोलिसांचे नियंत्रण नाही. पुसद, उमरखेडचे कनेक्शन हैदराबादशी जुळले आहे, तर यवतमाळ, बाभूळगाव येथे मध्य प्रदेशमधून शस्त्र येतात.

१० फेब्रुवारीला बहिणीचे लग्न

डाॅ. हनुमंत धर्मकारे यांच्या बहिणीचे १० फेब्रुवारीला लग्न आहे. त्याची तयारी करण्यासाठीच डाॅ. उपजिल्हा रुग्णालयातून रजेवर होते. मात्र, त्यानंतरही ते नियमित रुग्णालयाच्या बाजूला असलेल्या टपरीवर चहापानासाठी जात होते.

गोळीबार देशीकट्ट्यातूनच

सहा राउंड बसणाऱ्या देशी कट्ट्यातूनच गोळीबार करण्यात आला. चार गोळ्या फायर केल्यानंतर उरलेल्या दोन गोळ्या असलेले मॅगझिन घटनास्थळी पडले.

असे आहे आरोपीचे वर्णन

आरोपी २५ वर्षे वयोगटातील असून, त्याने पाठीवर बॅग लावलेली होती. काळ्या रंगाचे जरकीन अंगात होते. लांब नाक व गाैरवर्णीय असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

Web Title: brutal murder of doctor by firing bullets in umarkhed yavatmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.