काळीदौलतमध्ये तरुणाचा निर्घृण खून, तलवारीने हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2021 05:00 AM2021-12-04T05:00:00+5:302021-12-04T05:00:12+5:30

श्याम राठोड हा तरुण आपला भाऊ लक्ष्मण शेषराव राठोड याच्यासह काही कामानिमित्त दुचाकीवर निघाला होता. या दरम्यान बसस्थानक परिसरात त्याच्या दुचाकीचा एका तरुणाला धक्का लागला. या क्षुल्लक कारणावरून संबंधित तरुणाने आपल्या साथीदारासह श्याम व त्याच्या भावाविरुध्द वाद घातला. वाद वाढत जावून श्यामवर तलवारीने वार करण्यात आले. यात श्यामचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन पसार झाले.  

Brutal murder of a youth in Kalidaulat, attack with sword | काळीदौलतमध्ये तरुणाचा निर्घृण खून, तलवारीने हल्ला

काळीदौलतमध्ये तरुणाचा निर्घृण खून, तलवारीने हल्ला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव / पुसद : रस्त्याने जाताना केवळ दुचाकीचा धक्का लागला या कारणावरून दोन तरुणांचे भांडण पेटले. त्यातच दुचाकीस्वार तरुणावर तलवारीने वार करून त्याचा निर्घृण खून करण्यात आला. ही घटना शुक्रवारी भरदुपारी काळीदौलत खान येथे वर्दळीच्या ठिकाणी घडली. 
श्याम शेषराव राठोड (२२) रा. काळी असे या घटनेतील मृताचे नाव आहे. तर श्याम याच्यावर जीवघेणा हल्ला करणारे अज्ञात आरोपी पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. दरम्यान, श्यामचा खून झाल्याचे कळताच त्याच्या नातेवाईकांमध्ये हलकल्लोळ उडाला. काही नागरिकांनी सायंकाळी बसस्थानक परिसरात जाळपोळ केली. या घटनेला जातीय रंग आल्याने काही काळ गावात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. 
श्याम राठोड हा तरुण आपला भाऊ लक्ष्मण शेषराव राठोड याच्यासह काही कामानिमित्त दुचाकीवर निघाला होता. या दरम्यान बसस्थानक परिसरात त्याच्या दुचाकीचा एका तरुणाला धक्का लागला. या क्षुल्लक कारणावरून संबंधित तरुणाने आपल्या साथीदारासह श्याम व त्याच्या भावाविरुध्द वाद घातला. वाद वाढत जावून श्यामवर तलवारीने वार करण्यात आले. यात श्यामचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन पसार झाले.  खुनाची वार्ता  तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली. काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. दिलीप पाटील भुजबळ यांनी तातडीने घटनास्थळ गाठून पाहणी केली. पुसद ग्रामीण पोलीस घटनेचा अधिक तपास करीत आहे.  ही घटना  दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणातून घडली की, मृत व हल्लेखोरांचे काही पूर्ववैमनस्य होते, या बाबत नागरिकांमध्ये तर्कवितर्क लढविले जात आहे. 

श्याम करीत होता पाेलीस भरतीची तयारी 
- २२ वर्षीय श्याम राठोड हा तरुण गेल्या अनेक महिन्यांपासून पोलीस भरतीची तयारी करीत होता. नुकतीच त्याला दुसऱ्या एका नोकरीची ऑफरही आली होती, अशी चर्चा आहे. मात्र शुक्रवारच्या हल्ल्यात श्याम संपला. गेल्या काही दिवसात किरकोळ वादातून थेट खुनाच्या घटना वाढत आहे. बेरोजगारी, असुरक्षितता आणि व्यसनाधिनता यातून अनेक तरुण गुन्हेगारीकडे वळत असल्याचे निरीक्षण मानसोपचार तज्ज्ञांनी नोंदविले. 

कृतीदलाचे जवान पाचारण करून घटनास्थळी बंदोबस्त लावला आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे. गावकऱ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. आरोपींना लवकरच अटक केली जाईल. 
- डाॅ. दिलीप पाटील भुजबळ
जिल्हा पोलीस अधीक्षक

 

Web Title: Brutal murder of a youth in Kalidaulat, attack with sword

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.