जिल्हा परिषदेत ‘बजेट’ने वादंग
By admin | Published: April 15, 2017 12:09 AM2017-04-15T00:09:58+5:302017-04-15T00:09:58+5:30
जिल्हा परिषदेच्या २०१७-१८ च्या २७ कोटी ७१ लाख खर्चांच्या अंदाजपत्रकावरून पहिल्याच सर्वसाधारण सभेत वादंग होण्याची शक्यता बळावली आहे.
यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या २०१७-१८ च्या २७ कोटी ७१ लाख खर्चांच्या अंदाजपत्रकावरून पहिल्याच सर्वसाधारण सभेत वादंग होण्याची शक्यता बळावली आहे.
यावर्षी ऐन अर्थसंकल्प सादर करण्याच्या काळात निवडणूक आली. अर्थ समिती सभापतीच नसल्याने वित्त विभागाने आपल्या मर्जीने अंदाजपत्रक तयार केले. या अंदाजपत्रकात नवीन पदाधिकारी व सदस्यांच्या एकाही सूचनेचा समावेश नाही. त्यावर पूर्णपणे प्रशासनाची छाप आहे. त्याच्या प्रती पदाधिकाऱ्यांना अवलोकनासाठी देण्यात आल्या. मात्र त्याची प्रत एकाही सदस्याला देण्यात आली नाही. त्यामुळे काही सदस्यांनी प्रतीची मागणी केली.
येत्या २५ एप्रिल रोजी पहिली सर्वसाधारण सभा आयोजित असून या सभेत अंदाजत्रक चांगलेच पेटण्याची शक्यता आहे. सभेत प्रथम उपाध्यक्ष व दोन सभापतींना खाते वाटप केले जाईल. या सभेत काँग्रेसचे काही सदस्य अंदाजपत्रकावरून आक्रमक होण्याचे संकेत आहे.
शिवसेनेचे अनेक सदस्यही अंदाजपत्रकावरून वित्त विभागाला धारेवर धरण्याच्या तयारीत आहे. काही तरतुदींवर सदस्य नाराज आहे. त्यावर सुचविलेल्या सुधारणा अंदाजपत्रकात समाविष्ट न केल्यास ही सभा वादळी ठरणार आहे. (शहर प्रतिनिधी)