२७ कोटी खर्चाचे अंदाजपत्रक

By admin | Published: April 17, 2017 12:20 AM2017-04-17T00:20:40+5:302017-04-17T00:20:40+5:30

जिल्हा परिषदेने २०१७-१८ साठी २७ कोटी ७१ लाख रूपये खर्चाचे अंदाजपत्रक तयार केले. यात बांधकाम, कृषी, समाजकल्याण,

Budget estimates for 27 crores | २७ कोटी खर्चाचे अंदाजपत्रक

२७ कोटी खर्चाचे अंदाजपत्रक

Next

जिल्हा परिषद : बांधकाम, कृषी, समाजकल्याणसाठी भरीव तरतूद
यवतमाळ : जिल्हा परिषदेने २०१७-१८ साठी २७ कोटी ७१ लाख रूपये खर्चाचे अंदाजपत्रक तयार केले. यात बांधकाम, कृषी, समाजकल्याण, महिला व बालकल्याण आदी विभागांसाठी भरीव तरतूद आहे. मात्र समाजकल्याण, कृषी आदी विभागांचे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याने या विभागांची तरतूद मागीलवर्षीप्रमाणेच याहीवर्षी अखर्चित तर राहणार नाही ना, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीमुळे यावर्षीचे अंदाजपत्रक वित्त विभागाने तयार केले. त्यात पदाधिकारी, सदस्यांच्या सूचनांचा समावेश नाही. हे अंदाजपत्रक पदाधिकाऱ्यांना अवलोकनार्थ देण्यात आले. ते पहिल्या सर्वसाधारण सभेत मांडून त्याला अंतिम मंजुरी बहाल केली जाणार आहे. त्यात पदाधिकारी, सदस्यांच्या सूचनांचा समावेश होण्याची शक्यता आहे. तथापि तूर्तास २७ कोटी ७१ लाख ६१ हजार रूपये खर्चांचे अंदाजपत्रक तयार झाले आहे.
या अंदाजपत्रकात सर्वाधिक चार कोटी ५५ लाखांची तरतूद बांधकाम विभाग क्रमांक दोनसाठी आहे. बांधकाम विभाग क्रमांक एकसाठी तीन कोटी ३२ लाख २७ हजारांची तरतूद केली गेली. समाजकल्याण विभागासाठी तीन कोटी पाच लाखांची, तर संर्कीण हेडअंतर्गत कामांसाठी तीन कोटी ९१ लाखांची तरतूद करण्यात आली. कृषी विभागासाठी दोन कोटी २२ लाख ५६ हजारांची तरतूद आहे. याशिवाय पशुसंवर्धन विभागासाठी एक कोटी ३६ लाख, तर महिला व बालकल्याण विभागासाठी एक कोटी ३६ लाखांची तरतूद आहे.
सामूहिक विकासासाठी एक कोटी २४ लाख, वनांसाठी एक कोटी, सामान्य प्रशासन विभागासाठी एक कोटी १२ लाखांची तरतूद केली गेली. शिक्षण विभागासाठी ९७ लाख ५१ हजार, पाटबंधारे सिंचनासाठी ५१ लाख, आरोग्य व अभियांत्रिकीसाठी ९० लाख, दिव्यांग कल्याणासाठी ४४ लाख, सार्वजनिक आरोग्यासाठी २० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. एकूण २७ कोटी ७१ लाख १६ हजार रूपयांचा खर्च नवीन आर्थिक वर्षात अपेक्षित आहे. दरम्यान, काही सदस्यांनी या अंदाजपत्रकाची प्रत उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. (शहर प्रतिनिधी)

मागीलवर्षीच्या अंदाजात प्रचंड तफावत
२०१६-१७ चे मूळ अंदाजपत्रक तब्बल ४२ कोटी १४ लाख १७ हजारांचे होते. मात्र सुधारित अंदाजपत्रक केवळ २६ कोटी १४ लाख ३३ हजारांचे झाले. यावरून त्या अंदाजपत्रकात प्रचंड तफावत असल्याचे स्पष्ट झाले. मूळ आणि सुधारित अंदाजपत्रकात तब्बल १६ कोटींचा फरक दिसून आला. मागीलवर्षीच्या मूळ अंदाजपत्रकात प्रचंड खर्चाची तरतूद करूनही निधी शिल्लक राहिला, असाच याचा अर्थ होतो. तीच गत यावर्षी होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पदाधिकाऱ्यांवर दीड कोटींचा खर्च
सुरू आर्थिक वर्षात अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, उपसभापती, सदस्यांवर तब्बल एक कोटी ४४ लाख १८ हजार रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. यात त्यांचे मानधन, सभा भत्ता आदींचा समावेश असणार आहे. मागीलवर्षी पदाधिकारी, सदस्यांवर एक कोटी ४२ लाख २३ हजारांचा खर्च झाला होता. यात यावर्षी दोन लाखांचा खर्च जादा होण्याची शक्यता आहे.

 

Web Title: Budget estimates for 27 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.