रस्त्यावर जनावरे बांधून चक्काजाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 10:05 PM2017-11-09T22:05:58+5:302017-11-09T22:06:10+5:30
पशुवैद्यकीय दवाखान्यासमोरील अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर जनावरे बांधून महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथे संतप्त पशुपालकांनी रस्ता रोको आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
फुलसावंगी : पशुवैद्यकीय दवाखान्यासमोरील अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर जनावरे बांधून महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथे संतप्त पशुपालकांनी रस्ता रोको आंदोलन केले. तब्बल तीन तास झालेल्या या आंदोलनाने वाहतूक ठप्प झाली होती.
महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथे पशुवैद्यकीय दवाखान्यासमोर काही व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे या दवाखान्यात जाताना पशुपालकांना त्रास होत आहे. दवाखान्यात दूध संकलन केंद्र असून अतिक्रमणामुळे दूध घेवून जाणाºया वाहनालाही त्रास होतो. दूध उत्पादक शेतकºयांनी शासनाकडे कैफियत मांडली. महागाव तहसीलदार, उमरखेड एसडीओ व जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना निवेदन देवूनही निराशा पदरी पडली. त्यामुळे संतप्त पशुपालकांनी गुरुवारी फुलसावंगी येथील मुख्य मार्गावर जनावरे बांधून रस्ता रोको आंदोलन केले. भगिरथ नाईक यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकरी यात सहभागी झाले होते. तब्बल तीन तास वाहतूक रोखून धरली.
आंदोलनाची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता एस.बी. नाईक, नायब तहसीलदार एस.बी. शेलार, तलाठी गजानन कवाने यांनी भेट दिली. तीन दिवसात अतिक्रमण काढण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेतले. यानंतरही अतिक्रमण काढले नाही तर कामचुकार अधिकाºयांची वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचे शेतकरी स्वप्नील नाईक यांनी सांगितले. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.