बांधकामे जोरात, विकास कामे थंड
By admin | Published: July 16, 2016 02:42 AM2016-07-16T02:42:04+5:302016-07-16T02:42:04+5:30
आर्णी तालुक्यातील जवळा ही सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. विविध कामांव्दारे या ग्रामपंचायतीची विकासाकडे वाटचाल सुरू असल्याचे दिसत आहे.
जवळा ग्रामपंचायत : पावसाळ््यातही पाण्याची समस्या कायमच
जवळा : आर्णी तालुक्यातील जवळा ही सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. विविध कामांव्दारे या ग्रामपंचायतीची विकासाकडे वाटचाल सुरू असल्याचे दिसत आहे.
गावात मोठ्या प्रमाणात बांधकाम केले जात आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून खर्च न झालेला निधी ग्रामपंचायत आता खर्च करीत आहे. इतर मागास क्षेत्र अनुदान निधी गेल्या दोन-तीन वर्षांपासून पडून होता. ग्रामपंचायतीमधील अंतर्गत कलहामुळे तो पडून होता. मात्र आता ग्रामपंचायतीने निधी खर्च करण्याचा सपाटाच लावला आहे. ग्रामपंचायत इमारतीचे नूतनीकरण तसेच संपूर्ण ग्रामपंचायत परिसराला तार कुंपन, इमारतीला रंगरंगोटी करण्याचे काम सुरू आहे. त्याच बरोबर गेल्या कित्येक दिवसांपासून अर्धवट राहिलेले राजीव गांधी भवनाचे कामसुद्धा जनसुविधेंतर्गत मिळालेल्या निधीतून केले जात आहे. वॉर्ड क्र. ३ मध्ये सिमेंट रस्त्याचे कामही लवकरच सुरू होणार आहे. आमदार बेग यांच्या निधीतूनसुद्धा मोठ्या प्रमाणात विकासकामे मंजूर झालेली दिसत आहे.
ऐवढे असूनसुद्धा गावामध्ये पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाळ््यातसुद्धा महिला आणि मुले पाण्यासाठी पायपीट करताना दिसत आहेत. गावातील गटारे कचऱ्याने तुंबलेली आहे. जागोजागी उकिरडे पडलेले असून, ग्रामस्वच्छतेचे तीन-तेरा वाजलेले दिसत आहे. गावामध्ये दिवाबत्तीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्युत दिवे बंद अवस्थेत पडून आहे. ग्रामपंचायतीला इमारत बांधकामाबरोबरच नागरिकांच्या गरजांकडेसुद्धा लक्ष दिले पाहिजे, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून केली जात आहे.
विकास कामे करताना कुठल्या कामांना प्राधान्य दिले जावे, या बाबीचा येथे विचारच केला गेला नाही. केवळ निधी खर्चाचा सपाटा सुरू करण्यात आला आहे. पावसाळ्याच्या दिवसात पथदिवे सुरू राहणे सुरक्षेच्यादृष्टीने अतिशय आवश्यक आहे. मात्र ही बाब याठिकाणी गांभीर्याने घेण्यात आलेली नाही. (वार्ताहर)