बिल्डर लॉबी अडकली व्याजाच्या चक्रव्यूहात

By admin | Published: December 29, 2015 08:26 PM2015-12-29T20:26:18+5:302015-12-29T20:26:18+5:30

पुणे वगळता सर्वत्र रिअल इस्टेट व्यवसायात गेल्या काही महिन्यांपासून मंदीचे वातावरण पाहायला मिळत आहे. नवनवीन ले-आऊट मोठ्या प्रमाणात थाटले गेले.

Builder lobby stuck in the cyclone of interest | बिल्डर लॉबी अडकली व्याजाच्या चक्रव्यूहात

बिल्डर लॉबी अडकली व्याजाच्या चक्रव्यूहात

Next

यवतमाळ : पुणे वगळता सर्वत्र रिअल इस्टेट व्यवसायात गेल्या काही महिन्यांपासून मंदीचे वातावरण पाहायला मिळत आहे. नवनवीन ले-आऊट मोठ्या प्रमाणात थाटले गेले. मात्र तेथील प्लॉटच्या खरेदीसाठी ग्राहकच पुढे येताना दिसत नाहीत. प्लॉटचे अव्वाच्या सव्वा वाढवून ठेवलेले भाव हे प्रमुख कारण त्यासाठी सांगितले जात आहे. रिअल इस्टेट व्यवसाय तेजीत असताना दलालांनी मोठ्या प्रमाणात ही भाववाढ निर्माण केली. प्लॉट मालकाला ठराविक भाव देवून त्यावरील भाव मार्जीन म्हणून स्वत:च्या खिशात घालण्याचा फंडा वापरला गेला. त्यातूनच प्रचंड भाववाढ झाली. दलाल त्यात मालामाल झाले. हे भाव मात्र आज सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. दहा लाखांच्या आत कुठेही फ्लॅट नाही अशी स्थिती आहे. १५ लाखांचा फ्लॅट घ्यायचा असेल तर गावाच्या बाहेर जावे लागते. शहरातील बसस्थानकापासून चार किलोमीटर बाहेर गेले तरी एक हजारापेक्षा कमी दराचा प्लॉट मिळेनासा झाला आहे. या स्थावर मालमत्तेचे आधीच दुपटीने दर वाढवून ठेवल्याने आज ते मध्यमवर्गीयालाही परवडेनासे झाले आहे. दलालांच्या दुप्पट दरवाढीच्या फंड्यामुळेच आज रिअल इस्टेटमध्ये प्रचंड मंदी पाहावी लागत आहे. आज शहराच्या चहूबाजूने प्लॉट, फ्लॅट, रो हाऊसेस पडून आहेत. मात्र त्याला खरेदीदार नाहीत. बिल्डर लॉबीने रिअल इस्टेटमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. त्यासाठी राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांचे कर्जही घेतले. परंतु आज मालाला उठाव नसल्याने ही बिल्डर लॉबी व्याजाच्या चक्रव्यूहात अडकली आहे. खासगी बँका-पतसंस्थांचे १६ ते १८ टक्के व्याज त्यांना चुकवावे लागत आहे. मंदीची लाट असलीतरी कुणीही कमी दरात आपली मालमत्ता विकण्यास तयार नाही, हेही तेवढेच खरे आहे. ‘व्याज भरू मात्र दर उतरविणार नाही’ अशी बिल्डर लॉबीची भुमिका आहे. यवतमाळातील मंदीमागे सातबारावरील ‘आदिवासींची जमीन’ असल्याचे शिक्के, ताठर जिल्हा प्रशासन व त्याचा तलाठ्यापर्यंत तसेच अन्य विभागातही झालेला परिणाम ही कारणे सांगितली जात आहे. महसूल प्रशासनाकडे नव्या ले-आऊटचे आलेले प्रस्ताव बिल्डरांनीच थंडबस्त्यात ठेवणे पसंत केले आहे. आतातर प्लॉट, फ्लॅट पाहायला येणाऱ्यांची संख्याही रोडावली आहे. तरीही बिल्डर लॉबीला नव्या आर्थिक वर्र्षात गुंतवणूक होईल, असा आशा आहे. एप्रिल ते जून या तिमाहीत काही प्रमाणात मालाला उठाव होण्याचा अंदाज वर्तविली जात आहे.
मंदीची ही लाट केवळ रिअल इस्टेट व्यवसायापुरतीच मर्यादित नाही. सराफा बाजार, कपडा बाजार आणि बांधकामाशी संबंधित सर्व व्यवसायांवर ही मंदी पाहायला मिळते. सराफा बाजारातील गुंतवणुकदारांची वर्दळ मंदावली आहे. लग्नकार्याच्या निमित्ताने अत्यावश्यक दागिन्यांचीच तेवढी खरेदी केली जात आहे. पैसाच नसल्याने कापड बाजारातही शुकशुकाट आहे. सततची दुष्काळी परिस्थिती, सोयाबीनचे बुडालेले पीक, अर्ध्यावर आलेले कापसाचे उत्पादन, त्यालाही नसलेला भाव, बेरोजगारीचे संकट, शेतमजुरांची कामासाठी होणारी भटकंती अशा विविध बाबी या मंदीच्या लाटेसाठी कारणीभूत ठरल्या. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Builder lobby stuck in the cyclone of interest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.