उमरखेडमध्ये बांधकाम व्यावसायिकांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 12:23 AM2019-01-10T00:23:04+5:302019-01-10T00:23:46+5:30
तालुक्यातील रेती घाटांचे अद्याप लिलाव न झाल्याने तालुक्यातील विकास कामे व बांधकामे पूर्णत: थांबली. यामुळे व्यापारी, मजूर, कंत्राटदार यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याने त्यांनी बुधवारी मोर्चा काढून तहसीलवर धडक दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : तालुक्यातील रेती घाटांचे अद्याप लिलाव न झाल्याने तालुक्यातील विकास कामे व बांधकामे पूर्णत: थांबली. यामुळे व्यापारी, मजूर, कंत्राटदार यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याने त्यांनी बुधवारी मोर्चा काढून तहसीलवर धडक दिली.
गेल्या चार महिन्यांपासून रेतीचा तुटवडा आहे. त्यामुळे बांधकाम व्यवसायावर मोठा परिणाम झाला. मिस्त्री, मजूर, बांधकाम कामगार, व्यापारी, कंत्राटदार, सुतार आदी घटकांवर विपरित परिणाम झाला. कामगारांना काम मिळत नसल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ ओढवली. परिणामी अनेक कुटुंबे कामाच्या शोधात स्थलांतर करीत आहे. शासनाने रेती उपलब्ध करून दिली, तर मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू होतील. तसेच शासकीय विकास कामेसुद्धा सुरू होतील. त्यामुळे मजुरांच्या हाताला काम मिळेल. मजुरांच्या कुटुंबांची उपासमार होणार नाही. त्यासाठी शासनाने तत्काळ रेती घाट व साठ्याचा लिलाव करून रेती उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आहे. या मागणीसाठी शेख जाकीर शेख रऊफ, गजराजसिंह चव्हाण, महेश अलट, सय्यद परवत इसार सय्यद काझी, डॉ.कोडगीलवार, राज भंडारी, अफसर ठेकेदार, जिम अग्रवाल, जमीर पेंटर, जाफर भाई, मकरंद पत्तेवार यांच्यासह शेकडो मजूर, कामगार, मिस्त्री, कंत्राटदार आदींनी तहसीलवर धडक दिली. मागणडीचे निवेदन तहसीलदारांना सादर केले.