बैलबाजारावर संक्रांत
By admin | Published: January 4, 2016 04:40 AM2016-01-04T04:40:10+5:302016-01-04T04:40:10+5:30
दुष्काळाच्या सावटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी बैल विक्रीला काढले. महिना लोटला तरी बैलबाजारात बैलांना ग्राहक मिळेनासे
दुष्काळाने दर पडले : महिना लोटला तरी ग्राहक मिळेना
रूपेश उत्तरवार ल्ल यवतमाळ
दुष्काळाच्या सावटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी बैल विक्रीला काढले. महिना लोटला तरी बैलबाजारात बैलांना ग्राहक मिळेनासे झाले आहेत. गोवंश हत्याबंदीसह दुष्काळाने बाजारात बैलाचे दर पडले आहेत. वैतागलेल्या शेतकऱ्यांनी पर्याय म्हणून म्हशी विक्रीला काढल्या आहेत. परिणामी बाजारात बैलाच्या जागेवर म्हशी दिसत आहेत.
यवतमाळ जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. दुष्काळाने शेतकऱ्यांची स्थिती नाजूक झाली आहे. खासगी कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यांनी जनावर मोठ्या प्रमाणात विक्रीला काढले आहेत. गोवंश हत्याबंदी कायद्याने बैलांचा बाजारच गारद झाला आहे.
गाय अथवा बैलांना खरेदी करताच खरेदीदारांवर कायदेशीर बंधने येऊन पडली आहेत. या प्रकरणात पोलीस कारवाई होत आहे. यामुळे या व्यवसायातून व्यापाऱ्यांनी काढता पाय घेतला आहे. मोजकेच व्यापारी व्यवसायात शिल्लक राहीले आहेत. यातून बैलबाजार पूर्णत: गारद झाला आहे.
बैल आणि गाय खरेदी करण्यासाठी व्यापारी नाहीत. तर ज्या शेतकऱ्यांना ते खरेदी करायचे आहेत, त्यांच्याजवळ पैसा नाही. यामुळे बाजारात बैलाचे दर पडले आहेत. तर गाय खरेदी करणे व्यापाऱ्यांनी बंद केल्याने बाजारात गाय विक्रीला येत नाही. बैल विक्रीला येतात, मात्र त्याला व्यापारी खरेदी करीत नाही. शेतकरी घेत नाही. यामुळे महिनाभरापासून शेतकऱ्यांना के वळ बैलबाजाराच्या येरझारा माराव्या लागत आहे.
बैल नव्हे म्हैस बाजार
बैल आणि गाय खरेदी करण्यासाठी ग्राहक नाही. मात्र म्हैस खरेदी होत आहे. यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे म्हशी आहेत, त्यांनी बैलांऐवजी म्हशी विक्रीसाठी आणल्या आहेत. यामुळे बैलबाजारात बैल नावालाच आणि म्हशी अफाट, असे चित्र आहे.
प्रतिक्रिया
दुष्काळी स्थिती आणि कर्जबाजारीपणा यामुळे शेतकऱ्यांनी बैल विक्रीला काढले. बाजारात दर मिळायला तयार नाही. यामुळे शेतकऱ्यांना पडलेल्या दरात जनावर विकावे लागत आहेत.
- अब्दुल रहीम, शेतकरी, आर्वी
अलीकडे मजुरीचे दर वाढले. वर्षभर जनावर सांभाळणे अवघड आहे. दुसऱ्यांचे पैसे देणे बाकी आहे. म्हणून बैल विकायला काढले. पावसाळ्यात कमी पैशात दुसरी जोडी घेण्याचा विचार आहे.
- विजय कार, शेतकरी, यवतमाळ
गत महिनाभरापासून बैल विक्रीसाठी काढले आहेत. मात्र त्याला ग्राहक भेटले नाही. पडलेल्या दरात बैल मागितले जात आहे. यामुळे शेतकरी संभ्रमात आहेत.
- मुकेश ढुमणे, शेतकरी, घारफळ
सोयाबीन डुबले, दुसरे पीक राहीले नाही. यामुळे कर्ज फेडण्यासाठी बैल विकावे लागत आहे. नुसत्या शेतीवर भागत नाही. यामुळे सारेच शेतकरी चिंतेत आहेत
- बाबाराव राठोड, शेतकरी, धामणी
यवतमाळच नव्हेतर देवगाव, राळेगाव, आर्णी, कळंब, दारव्हा आणि दिग्रस या ठिकाणच्या बैलबाजाराची स्थिती अशीच आहे.
- महंमद नासिर, व्यापारी