कळंबमध्ये चालला बुलडोजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 11:53 PM2017-09-15T23:53:08+5:302017-09-15T23:53:23+5:30
शहराला मोठ्या प्रमाणात अतिक्रमणाचा विळखा पडला होता. वारंवार सूचना देऊनही अतिक्रमण काढले जात नव्हते.
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब : शहराला मोठ्या प्रमाणात अतिक्रमणाचा विळखा पडला होता. वारंवार सूचना देऊनही अतिक्रमण काढले जात नव्हते. त्यामुळे अखेरीस शुक्रवारी कळंब नगरपंचायत प्रशासनाने अतिक्रमणावर बुलडोजर चालवून बहुतेक रस्त्यांना मोकळी वाट करुन देण्यात आली. रस्त्यांनी अनेक वर्षानंतर मोकळा श्वास घेतला, त्यामुळे नागरिकांमध्ये आनंद आहे.
तहसीलदार रणजित भोसले, नायब तहसीलदार देशपांडे, नगरपंचायतचे प्रभारी मुख्याधिकारी शशिमोहन नंदा, नगर पंचायत अभियंता प्रज्ञा नरवाडे, मिळकत व बाजार व्यवस्थापक एस.एम.मसराम, ठाणेदार बी.जी.कºहाळे, एपीआय संघरक्षक भगत, पीएसआय राजकिरण मडावी, चंद्रशेखर ठाकरे आदींच्या नेतृत्वात सकाळी सातपासून शहरातील अतिक्रमण काढण्यात सुरुवात झाली. सायंकाळपर्यंत अतिक्रमण काढण्याची प्रक्रीया सुरुच होती. सर्वप्रथम चिंतामणी मंदिर परिसरातील अतिक्रमण मोकळे करण्यात आले. त्यानंतर चिंतामणी मंदीर रोड, राम मंदिर, आठवडी बाजार परिसर, यवतमाळ-नागपूर रोड आदी भागातील संपूर्ण अतिक्रमण काढण्यात आले.
तत्पूर्वी स्वत:हून अतिक्रमण काढण्याच्या सूचना प्रशासनाकडून दोन दिवसांपूर्वीपासूनच देण्यात येत होत्या. त्यानुसार काहींनी स्वत: पुढाकार घेऊन अतिक्रमण काढले. तर काहींनी विरोध दर्शविला. त्यामुळे वादावादीचे प्रसंगीही घडले. काही काळ तणावाचे वातावरणही निर्माण झाले होते. परंतु पोलिसांनी वेळीच दखल घेऊन प्रकरणावर पडदा टाकला. विशेष म्हणजे काही नगरसेवक व पदाधिकाºयांचेही अतिक्रमण होते. त्यांचे अतिक्रमणसुद्धा या मोहिमेत नेस्तनाबूत करण्यात आले. आता पुन्हा अतिक्रमण होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे.
अतिक्रमण होऊच नये
अनेक वर्षानंतर आज अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. इतक्या मोठ्या प्रमाणातील अतिक्रमण काढण्याचा बहुधा हा पहिलाच प्रसंग असावा. त्यामुळे बहुतेक लोकांनी आनंद व्यक्त केला. एकंदरीत मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढल्याने रस्त्यासोबतच पादचरी व वाहनधारकांनीही सुटकेचा श्वास घेतला. यानंतर अतिक्रमण होणारच नाही, यासाठी प्रशासनाने वेळीच दखल घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.