झोपड्यांवर बुलडोजर, श्रीमंतांवर मेहरनजर
By admin | Published: March 21, 2017 12:03 AM2017-03-21T00:03:14+5:302017-03-21T00:03:14+5:30
थील यवतमाळ-आर्णी मार्गाचे चौपदरीकरण करताना अतिक्रमण काढण्यात येत आहे.
वडगाववासी संतप्त : महिलांचा आक्रोश, नागरिक रस्त्यावर उतरले, वाहतूक ठप्प
यवतमाळ : येथील यवतमाळ-आर्णी मार्गाचे चौपदरीकरण करताना अतिक्रमण काढण्यात येत आहे. मात्र, अतिक्रमण काढताना केवळ झोपड्या हटविण्यात आल्या आणि श्रीमंतांच्या इमारती वाचविण्यात आल्या. यामुळे वडगावातील नागरिकांनी प्रशासनाच्या सापत्न भूमिकेविरुद्ध संताप व्यक्त केला. सोमवारी येथे सायंकाळपर्यंत प्रचंड तणाव आणि गोंधळाची स्थिती होती.
यवतमाळ-आर्णी मार्गावरील वडगाव ग्रामपंचायतीसमोरील अतिक्रमण काढण्यास सोमवारी प्रारंभ झाला. मोक्षधाम मार्गाकडून अतिक्रमण काढण्यास प्रारंभ झाला. १३ मिटर ते २४ मिटरपर्यंतचे अतिक्रमण काढण्यात आले. यामध्ये ३० झोपड्या जमीनदोस्त झाल्या. ही मोहीम वडगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत येताच अडखळली. या ठिकाणी ज्ञानेश्वर गुल्हाने यांची इमारत अतिक्रमणात असल्याचा आरोप नागरिकांनी केला. रस्त्याच्या मार्किंगमध्ये हे उघडही झाले. परंतु, गुल्हाने यांनी या इमारतीचे अतिक्रमण हटविण्यावर ‘स्टे’ असल्याचे निवेदन बांधकाम विभागाकडे दिले. पण ही ‘स्टे आॅर्डर’ २०१२ ची असल्यामुळे त्याला अर्थ नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. ही इमारत पाडा अथवा आमच्या घराची नुकसान भरपाई द्या, अशी मागणी लावून धरली.
विकासकामात गरीब, श्रीमंत भेदभाव नको. अतिक्रमणाची कारवाई सर्वांवर समान व्हायला हवी. परंतु, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी अशोक कांडूरवार यांनी हा नियम पायदळी तुडवल्याचा आरोप करण्यात आला. त्यांना समोरील कारवाई करण्यासाठी नागरिकांनी घेराव घातला. या भागातील महिलांनी साखळी करून वाहतूक रोखून धरली. संपूर्ण तिढा सोडविण्यासाठी पोेलीस उपअधीक्षक पीयूष जगताप या ठिकाणी आले. पोलिसांचा बंदोबस्त होता. कायदेशीर बाबी जाणून दुसऱ्या दिवशी या इमारतीपासूनच कारवाई करण्याचा प्रस्ताव नागरिकांपुढे ठेवण्यात आला. मात्र संतप्त जमाव मानण्यास तयार नव्हता. या तोडग्याकरिता वडगाव ग्रामपंचायत कार्यालयात बैठक सुरू होती. कार्यालयाबाहेर प्रचंड तणाव होता. (शहर वार्ताहर)
चार वेळा मोहीम थांबली
या भागात आतापर्यंत चार वेळा अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. झोपड्या पाडण्यात आल्या. मात्र, श्रीमंतांच्या इमारतीपासून कारवाई सोडण्यात आली. अद्यापही इमारतीची कायदेशीर बाजू समोर का आली नाही, याचा जाब नागरिकांनी विचारला आहे. सोमवारी मोहीम सुरू असताना या भागातील प्रतिष्ठितांसह अतिक्रमण हटविणारे व्यक्ती रस्त्यावर होते.