मुहूर्तावर सराफा बाजारपेठ उजळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2021 05:00 AM2021-11-03T05:00:00+5:302021-11-03T05:00:11+5:30
साडेतीन शुभमुहूर्तापैकी धनत्रयोदशीचा मुहूर्त सर्वात शुभ मानला जातो. यावर्षी सोन्याचे दर घसरले आहे. त्यामुळेच यवतमाळच्या बाजारपेठेत मंगळवारी विक्रमी गर्दी होती. धनत्रयोदशीच्या खरेदीमध्ये सोन्याच्या खरेदीला पहिले प्राधान्य असते. यासाठी अनेक ग्राहकांनी आधीच ॲडव्हॉन्स बुकींग करुन ठेवली होती. तर अनेक ग्राहकांनी गतवर्षीचा सोन्याचा दर आणि यावर्षी असलेल्या सोन्याच्या दरातील तफावतीमुळे सोने खरेदीचा निर्णय घेतला. गतवर्षी एका तोळ्याला ५२ हजार रुपयांचा दर होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : मागील दोन दिवाळीला कोरोनाचे ग्रहण होते. यंदा कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाल्याने प्रशासनाने बहुतांश निर्बंध हटविले आहे. त्यातच मागील वर्षीच्या तुलनेत साधारण चार हजाराने सोन्याचे दर यंदा कमी झालेले आहे. परिणामी मंगळवारी अनेकांनी धनत्रयोदशीचा मुहूर्त गाठत सोने खरेदी केली. ग्राहकांमुळे दोन वर्षात प्रथमच सराफा व्यापारपेठ गर्दीने फुलल्याचे चित्र होते.
साडेतीन शुभमुहूर्तापैकी धनत्रयोदशीचा मुहूर्त सर्वात शुभ मानला जातो. यावर्षी सोन्याचे दर घसरले आहे. त्यामुळेच यवतमाळच्या बाजारपेठेत मंगळवारी विक्रमी गर्दी होती. धनत्रयोदशीच्या खरेदीमध्ये सोन्याच्या खरेदीला पहिले प्राधान्य असते. यासाठी अनेक ग्राहकांनी आधीच ॲडव्हॉन्स बुकींग करुन ठेवली होती. तर अनेक ग्राहकांनी गतवर्षीचा सोन्याचा दर आणि यावर्षी असलेल्या सोन्याच्या दरातील तफावतीमुळे सोने खरेदीचा निर्णय घेतला. गतवर्षी एका तोळ्याला ५२ हजार रुपयांचा दर होता. यावर्षी हा दर ४८ हजार ४०० रुपये ते ४८ हजार ७०० रुपये असा पाहायला मिळाला. एका तोळ्यामागे किमान चार हजार रुपयांची तफावत यावर्षी सोन्यामध्ये आहे. याशिवाय गुंतवणूक म्हणूनही ग्राहक आता सोन्याकडे वळलेले आहेत. त्यामुळेच ग्राहकांनी दीर्घ कालीन गुंतवणूक म्हणून सोने खरेदीवर भर दिल्याचे दिसून आले.
यवतमाळच्या बाजारपेठेला मंगळवारी सुटी असते. यावर्षी धनत्रयोदशीला मंगळवार होता. याच दिवशी मोठी खरेदी होण्याचा अंदाज असल्याने बाजारपेठ खुली ठेवण्यात आली होती. याच संधीचे ग्राहकांनी सोने केले. अगदी सकाळपासूनच सराफा बाजारपेठेतील प्रत्येक दुकानात तुडुंब गर्दी झाली होती. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी सराफा बाजारात सोन्याची दुप्पट विक्री झाली.
मागणी असूनही कारची डिलिव्हरी थांबली
- कोरोना प्रादूर्भाव कमी झाल्यानंतर कारच्या मागणीतही वाढ झाली आहे. त्यामुळेच धनत्रयोदशीचा मुहूर्त साधण्यासाठी अनेकांनी वाहनांची बुकिंग केली होती. जिल्ह्यात ५०० चारचाकी वाहनांची बुकिंग नोंदविण्यात आली आहे. यातील अडीचशे चारचाकी वाहने धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर जिल्ह्यात उपलब्ध होण्याचा अंदाज होता. प्रत्यक्षात सिलीकाॅन चीपअभावी ७० चारचाकी वाहनेच जिल्ह्यात पोहोचली आहे. यामुळे शुभमुहूर्ताच्या प्रतीक्षेत असलेल्या ग्राहकांना निराशेचा सामना करावा लागला. आता लक्ष्मीपूजन, पाडव्याला तरी वाहने पोहोचतील, अशी अपेक्षा विक्रेत्यांकडून व्यक्त केला जात आहे.