बँडबाजा बारात अन् शाळेत जाणाऱ्या चिमुकल्यांची बैलबंडी जोरात..!
By अविनाश साबापुरे | Published: July 1, 2024 07:15 PM2024-07-01T19:15:48+5:302024-07-01T19:16:11+5:30
शाळेत विद्यार्थ्यांचे धडाक्यात स्वागत : सीईओ, शिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्या शाळांना भेटी
यवतमाळ : पुढे बँडबाजा दणाणतोय.. मागे सजविलेल्या बैलबंडीत चिमुकले स्वार.. अन् त्या मागे गावकरी टाळ्या वाजवित निघालेले... हे दृश्य एखाद्या लग्नाच्या वरातीचे नव्हेतर शाळेच्या पहिल्या दिवसाच्या समारंभाचे होय. सोमवारी शाळेच्या पहिल्या दिवशी अशाच नानाविध पद्धतीने विद्यार्थ्यांचे धडाकेबाज स्वागत करण्यात आले. तर शाळेत आल्यावर या विद्यार्थ्यांशी अधिकारी वर्गाने हितगुजही केले.
सोमवारी १ जुलै रोजी शाळेच्या नव्या सत्राचा आरंभ करण्यात आला. यानिमित्ताने प्रत्येक शाळेत प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. शाळेत येताच सर्वात पहिले चिमुकल्यांच्या हातावर शिक्षक-शिक्षिकांनी चाॅकलेट, फफॅल ठेवले. एखाद्या पाहुण्यासारखे विद्यार्थ्यांचे ‘वेलकम’ करण्यात आले. मैदानात बसवून विद्यार्थ्यांशी गप्पा गोष्टी करण्यात आल्या. त्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते नव्या कोऱ्या पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. या निमित्ताने शिक्षण विभागाने शाळा भेटीचे नियोजन केले होते. त्यात सीईओ मंदार पत्की, शिक्षणाधिकारी प्रकाश मिश्रा, उपशिक्षणाधिकारी निता गावंडे, उपशिक्षणाधिकारी डॉ. शिल्पा पोलपेल्लीवार, सहायक गटविकास अधिकारी किशोर गोळे, गटशिक्षणाधिकारी पोपेश्वर भोयर, विस्तार अधिकारी प्रणिता गाढवे, विस्तार अधिकारी विद्या वैद्य, विस्तार अधिकारी दीपिका गुल्हाने, केंद्र प्रमुख सुदर्शन थोटे, साधनव्यक्ती शुभांगी वानखडे यांनी किन्ही येथील जिल्हा परिषद शाळेला भेट दिली. तर उपशिक्षणाधिकारी राजू मडावी यांनी जोडमोहा, येरद, रामपूर कारेगाव येथील जिल्हा परिषद शाळांना भेटी दिल्या. तसेच माध्यमिक शिक्षण विभागाचे योगेश डाफ यांनी कळंब येथील बेसिक शाळेसह पार्डीच्या जिल्हा परिषद शाळेत भेट देऊन पाठ्यपुस्तकांचे वाटप केले.
सीईओंनी केला ‘इको क्लब’चा प्रारंभ
जिल्हा परिषदेचे सीईओ मंदार पत्की यांनी किन्ही येथील शाळेत नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांच्या हस्ते वृक्षारोपणाने इको क्लब या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासोबतच त्यांनी शिक्षकांच्या समस्या जाणून घेतल्या.
इवल्या तळहातावर जिलेबीच्या गणगड्या !
येरदच्या जिल्हा परिषद शाळेत पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या तळहातावर गोड जिलेब्याच्या गणगड्या ठेवण्यात आल्या. त्यांचा आस्वाद घेत घेत विद्यार्थी एकमेकांशी गप्पा करण्यात गुंग झाले. तर कळंब तालुक्यातील सुकळीच्या जिल्हा परिषद शाळेने बैलबंडीतून विद्यार्थ्यांची वाजतगाजत मिरवणूक काढली.