नवदाम्पत्याची परदेश सहल हुकविणाऱ्या कंपनीला दणका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2018 04:55 AM2018-11-09T04:55:32+5:302018-11-09T04:56:02+5:30
परदेशात पर्यटनासाठी जाणाºया नवदाम्पत्याचा बेत हुकविणा-या सहल कंपनीला यवतमाळ जिल्हा ग्राहक न्यायालयाने दणका दिला आहे. चुकीची माहिती भरल्याने व्हिसा रद्द झाल्यामुळे या दाम्पत्याला परदेशी सहलीचा आनंद उपभोगता आला नाही.
- विलास गावंडे
यवतमाळ - परदेशात पर्यटनासाठी जाणा-या नवदाम्पत्याचा बेत हुकविणा-या सहल कंपनीला यवतमाळ जिल्हा ग्राहक न्यायालयाने दणका दिला आहे. चुकीची माहिती भरल्याने व्हिसा रद्द झाल्यामुळे या दाम्पत्याला परदेशी सहलीचा आनंद उपभोगता आला नाही. कंपनीने त्यांना भरपाई द्यावी, असा आदेश देण्यात आला आहे. मंचचे अध्यक्ष रवींद्र नगरे व सदस्य सुहास आळशी यांच्या उपस्थितीत सदर प्रकरणाचे कामकाज चालले.
पुसद येथील आशीष रमेश बजाज व अंकिता आशीष बजाज या नवदाम्पत्याने परदेशात पर्यटनासाठी थॉमसकूक इंडिया लि. या कंपनीकडे बुकिंग केली. सुपर बजेट अंतर्गत लंडन, पॅरिस, बेल्जीयम, स्वित्झरलँड या देशात फिरण्याची संधी मिळणार होती. मात्र कंपनीने ही सहल रद्द केली. तसे बजाज यांना कळविले. युरोपीयन वंडर ही परदेशी सहल जात असल्याचे त्यांना सांगितले.
यासाठी त्यांनी संमती दिली. आवश्यक त्या सर्व रकमा बजाज यांनी थॉमसकूक कंपनीकडे टप्प्या टप्प्याने जमा केल्या.
सहल कंपनीची मुजोरी
सहल केव्हा निघणार याची कंपनीकडे विचारणा सुरू असतानाच बजाज यांचा व्हिसा रद्द झाल्याचे कळविण्यात आले. त्यामुळे या दाम्पत्याचे विदेशवारीचे स्वप्न अपूर्ण राहिले. व्हिसा काढण्यासाठी आवश्यक सर्व कागदपत्र आणि माहिती दिल्यानंतरही रद्द का करण्यात आला याची माहिती थॉमसकूक कंपनीकडून दिली जात नव्हती. कंपनीने व्हिसाकरिता अपूर्ण कागदपत्र सादर केले. शिवाय माहितीही चुकीची नोंदविण्यात आली. त्यामुळे बजाज यांचा व्हिसा रद्द झाल्याचे स्पष्ट झाले. हा प्रकार झाल्यानंतरही कंपनीने त्यांना भरलेले संपूर्ण दोन लाख ७० हजार २७५ रुपये परत मिळणे अपेक्षित होते. मात्र कंपनीने सहल शुल्काच्या नावाखाली एक लाख ६१ हजार १६० रुपये कपात केले.
कंपनीवर निष्काळजीपणाचा ठपका
कपात केलेली रक्कम परत मिळावी, तसेच शारीरिक व मानसिक त्रास आणि तक्रारीचा खर्च मिळावा याकरिता बजाज यांनी थॉमसकूक कंपनीकडे मागणी केली. मात्र त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे सुरू झाली. अखेर त्यांनी न्यायासाठी यवतमाळ जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचात तक्रार दाखल केली. दोनही बाजूच्या युक्तिवादाअंती मंचाने थॉमसकूक कंपनीविरोधात निकाल दिला. बजाज यांना त्यांची कपात केलेली रक्कम एक लाख ६१ हजार १६० रुपये सव्याज द्यावी, मानसिक व शारीरिक त्रास आणि तक्रार खर्चापोटी २५ हजार रुपये द्यावे, असा आदेश दिला आहे. थॉमसकूक कंपनीच्या निष्काळजीपणामुळेच बजाज यांची परदेश सहल रद्द झाली, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.