आमदारांचा दणका, मध्यरात्रीच शवविच्छेदन
By admin | Published: January 25, 2017 12:09 AM2017-01-25T00:09:27+5:302017-01-25T00:09:27+5:30
शवविच्छेदनासाठी गयावया करणाऱ्या नातेवाईकांना मन:स्ताप देणाऱ्या रुग्णालय प्रशासनाला आमदार बच्चू कडू यांनी हिसका दाखविताच ...
बच्चू कडूंनी जागली रात्र : आर्णी मार्ग अपघातातील सात मृतदेह पहाटे नातेवाईकांच्या स्वाधीन
यवतमाळ : शवविच्छेदनासाठी गयावया करणाऱ्या नातेवाईकांना मन:स्ताप देणाऱ्या रुग्णालय प्रशासनाला आमदार बच्चू कडू यांनी हिसका दाखविताच मध्यरात्रीच शवविच्छेदन होऊन त्यांचे देह नागपूरकडे रवाना झाले. अपघातातील सात जणांचे शवविच्छेदन तातडीने व्हावे यासाठी गयावया करणाऱ्या नातेवाईकांचा सुरुवातीला प्रस्ताव धुडकावून ‘मेडिकल’ने पुन्हा हृदयशून्यतेचा परिचय दिला.
यवतमाळ -आर्णी मार्गावरील जेतवन जवळ सोमवारी झालेल्या भीषण अपघातात नागपूर जिल्ह्यातील सात जण ठार झाले. या सातही जणांचे मृतदेह यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शवगारात ठेवण्यात आले. नागपुरात नातेवाईकांना या अपघाताची माहिती होताच तातडीने यवतमाळ गाठले. तोपर्यंत रात्री ७ वाजले होते. सायंकाळनंतर शवविच्छेदन होत नाही, असे सांगून या नातेवाईकांची रुग्णालय प्रशासनाने बोळवण केली. अनोळखी गावात कोणताही आधार नसल्याने रात्र शवविच्छेदन गृहाबाहेर थांबण्याचा निर्णय घेतला. त्यातील काही जण याच परिसरातील शासकीय विश्रामगृहावर आले. त्या ठिकाणी रात्री ११ वाजता अचानक आमदार बच्चू कडू यांची भेट झाली. त्यांनी चौकशी केली असता नातेवाईकांनी घटनाक्रम सांगितला. यामुळे संतप्त झालेल्या आमदार कडू यांनी सुरुवातीला ‘मेडिकल’चे अधिष्ठाता डॉ. अशोक राठोड यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला. परंतु कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर रुग्णालयचे अधीक्षक डॉ. बाळकृष्ण बांगडे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघांकडूनही प्रतिसाद मिळाला नाही.
अखेर आमदार कडू यांनी मुंबई मंत्रालयात दूरध्वनीवर या घटनेची माहिती दिली. त्यानंतर अधिष्ठातांना मंत्रालय स्तरावरून सूचना देण्यात आली. त्याउपरही अधिष्ठातांकडून शवविच्छेदनाबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून आमदार बच्चू कडू यांनी कार्यकर्त्यांसह आम्हीच शवविच्छेदन करणार असा इशारा दिला. यामुळे धास्तावलेल्या रुग्णालय प्रशासनाची ढिम्म यंत्रणा मध्यरात्री गतिमान झाली. एकापाठोपाठ एक सात मृतदेहांचे शवविच्छेदन करून ते नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. पहाटेपर्यंत खुद्द आमदार बच्चू कडू हे शवविच्छेदनगृह परिसरात ठाण मांडून बसले होते. नातेवाईकांना अशक्यप्राय वाटणारी मदत मिळाल्याने या दु:खाच्या प्रसंगातही त्यांना मायेचा ओलावा मिळाला.
यापूर्वी ‘मेडिकल’च्या हृदयशून्यतेचा परिचय आला होता. गंभीर जखमी रुग्ण लघुशस्त्रक्रिया गृहाच्या टेबलवरून खाली कोसळला. तो तडफडत असतानाही तत्काळ मदत केली नाही. सायंकाळी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच्यावर योग्य उपचार झाले असते आणि तो टेबलवरून खाली पडला नसता तर वाचला असता असे नागपूरवरून आलेल्या नातेवाईकांनी उद्वविग्न होऊन सांगितले. (कार्यालय प्रतिनिधी)