बंडोबा झाले थंडोबा

By admin | Published: February 8, 2017 12:15 AM2017-02-08T00:15:40+5:302017-02-08T00:15:40+5:30

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील बंडोबांना थंड करताना सर्वच प्रमुख पक्षांच्या नेत्यांच्या तोंडाला फेस आला.

Bundoba became cool | बंडोबा झाले थंडोबा

बंडोबा झाले थंडोबा

Next

नेत्यांना यश : जि. प. १५३ तर पं. स. २०७ माघार
यवतमाळ : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील बंडोबांना थंड करताना सर्वच प्रमुख पक्षांच्या नेत्यांच्या तोंडाला फेस आला. त्यांना भविष्यातील राजकीय ‘गणिते’ देऊन शांत करण्यात अनेक नेत्यांना बऱ्यापैकी यश आले. काही बंडोबा मात्र नेत्यांची विनंती झुगारुन निवडणुकीच्या आखाड्यात शड्डू ठोकून आहेत.
जिल्हा परिषदेच्या ५५ व १६ पंचायत समित्यांमधील ११० जागांसाठी १६ फेब्रुवारीला तर उर्वरित सहा गट व १२ गणांसाठी दुसऱ्या टप्प्यात २१ फेब्रुवारीला निवडणूक होत आहे. पहिल्या टप्प्यातील नामांकन मागे घेण्याचा मंगळवार अखेरचा दिवस होता. त्यात जिल्हा परिषदेच्या १५३ तर पंचायत समितीच्या २०७ उमेदवारांनी नामांकन मागे घेतले आहे. त्यात अपक्षांसह प्रमुख पक्षांच्या बंडखोर कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
मंगळवार हा अखेरचा दिवस असल्याने सर्वच प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी दोन दिवसांपासून बंडखोरांची मनधरणी करण्याची गती वाढविली होती. त्यांच्या वारंवार बैठका घेतल्या. शब्द मानणाऱ्या व्यक्तीच्या माध्यमातून त्यांना थंड करण्याचा प्रयत्न झाला. पक्षात ऐनवेळी आलेल्यांना, नवख्यांना तुम्ही उमेदवारी दिली आणि आम्ही वर्षानुवर्षे पक्षात प्रामाणिकपणे व निष्ठेने काम करूनही नेमकी उमेदवारीच्या वेळी आमची उपेक्षा का?, लाभाच्या वेळी तुम्ही नात्यातील, मर्जीतील लोक पुढे करता आणि आम्ही आयुष्यभर झेंडे पकडून सतरंज्याच उचलायच्या का ? असा या बंडखोरांचा सवाल होता. त्यांच्या या प्रश्नावर नेतेही अनुत्तर झाले. परंतु मध्यम मार्ग काढून या बंडखोरांना थंड करण्यात नेत्यांनी बऱ्यापैकी यश मिळविले. काहींना मंडळ, समित्या, कंत्राट व लाभाच्या अन्य बाबींचे ‘चॉकलेट’ दिले गेले. (जिल्हा प्रतिनिधी)

५५ जागांसाठी ३१९ उमेदवार
जिल्हा परिषदेच्या पहिल्या टप्प्यातील ५५ जागांसाठी आता ३१९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. तर १६ पंचायत समित्यांमधील ११० जागांसाठी ६०९ उमेदवार रिंगणात आहेत. दुसऱ्या टप्प्यातील नामांकन मागे घेण्यासाठी १३ फेब्रुवारी अखेरचा दिवस आहे.

 

Web Title: Bundoba became cool

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.