भूमाफियांचा घाटंजीच्या शिक्षकाला दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 09:46 PM2018-07-26T21:46:49+5:302018-07-26T21:47:29+5:30

भूमाफियांविरोधात पोलिसांकडे तक्रारदारांची रीघ लागलेली असताना त्यांचे भूखंड गैरव्यवहारातील आणखी नवनवीन कारनामे उघड होत आहेत. या भूमाफियांनी घाटंजी येथील एका शिक्षकाचा पांढरकवडा चौफुलीनजीक असलेला २० हजार चौरस फुटाचा भूखंड हडपल्याचे खळबळजनक प्रकरण पुढे आले आहे.

Bunker | भूमाफियांचा घाटंजीच्या शिक्षकाला दणका

भूमाफियांचा घाटंजीच्या शिक्षकाला दणका

Next
ठळक मुद्देएकाच भूखंडावर दोन बँकांमधून सात कोटींच्या कर्जाची उचल

पांढरकवडा चौफुलीवरील २० हजार चौरस फुटाचा भूखंड हडपला
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : भूमाफियांविरोधात पोलिसांकडे तक्रारदारांची रीघ लागलेली असताना त्यांचे भूखंड गैरव्यवहारातील आणखी नवनवीन कारनामे उघड होत आहेत. या भूमाफियांनी घाटंजी येथील एका शिक्षकाचा पांढरकवडा चौफुलीनजीक असलेला २० हजार चौरस फुटाचा भूखंड हडपल्याचे खळबळजनक प्रकरण पुढे आले आहे. एवढेच नव्हे तर हा एकच भूखंड दोन बँकांमध्ये तारण ठेऊन त्यावर सहा कोटी ८० लाख रुपयांच्या कर्जाची उचलही केली गेली.
शिक्षकाचा भूखंड हडपणारा हा भूमाफिया बांधकाम क्षेत्रातील कंत्राटदार आहे. त्याला सत्ताधारी भाजपाचा भक्कम आशीर्वाद आहे. त्याची शहरात कोट्यवधींची बांधकामे सुरू आहेत. सदर कंत्राटदार गेल्या पाच दिवसांपासून घरापासून दूर आहे. त्याच्या विरोधात राजकीय आशीर्वादामुळे पोलीस रेकॉर्डवर अद्याप काहीही नोंदविले गेले नसले तरी त्याच्या शोधार्थ पोलीस जीप दोन वेळा त्याच्या घरी जाऊन आल्याचे सांगितले जाते.
घाटंजीतील शिक्षकाने काही वर्षांपूर्वी पांढरकवडा चौफुलीवर २० हजार चौरस फुटाचा भूखंड खरेदी केला. परंतु लतेश नामक कंत्राटदाराने परस्परच हा भूखंड स्वत:च्या नावावर करून घेतला. एवढेच नव्हे तर प्रत्यक्षात स्वत:ची कोणतीही मालकी नसलेल्या या एकाच भूखंडावर यवतमाळातील एका बँकेकडून साडेचार कोटी तर दुसऱ्या बँकेकडून दोन कोटी ३० लाख रुपयांचे कर्ज उचलण्यात आले. ‘लोकमत’ने भूमाफियांच्या कारनाम्यांचा भंडाफोड केल्यानंतर लतेशचा कारनामाही उघड झाला. त्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी सदर शिक्षकाकडे तडजोडीचा प्रस्ताव ठेवला. त्यामुळेच सदर शिक्षक सध्या तरी गप्प असल्याचे बोलले जाते.
लतेशने असे आणखी काही भूखंड हडपले असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यावरील कर्जाचा आकडा १७ ते १९ कोटींच्या घरात असल्याचेही सांगण्यात येते.
म्हणे, एसआयटी ‘ताटा खालचे मांजर’ !
शिक्षकाचा हडपलेला भूखंड व त्यावरील सहा कोटी ८० लाखांचे कर्ज प्रकरणानिमित्ताने लतेशचे नाव पुढे आले. लतेश हा पैसा शहरातील ‘रानो व बंटी’ या प्रमुख दोन क्रिकेट बुकींगकडे हरला. पोलिसांचे हात या बुकींपर्यंत पोहोचू शकतात, अशी शक्यता वर्तविली जात आहे. परंतु प्रत्यक्षात हे दोन्ही बुकी पोलिसांना जुमानत नाहीत. एवढेच नव्हे तर भूखंड घोटाळ्याच्या तपासासाठी यवतमाळचे एसडीपीओ पीयूष जगताप यांच्या नेतृत्वात स्थापन करण्यात आलेली एसआयटी (पोलिसांचे विशेष तपास पथक) तर आमच्या ‘ताटा खालचे मांजर’ असल्याच्या वल्गना हे बुकी करीत असल्याचे सांगितले जाते. त्यासाठी कोण पोलीस अधिकारी किती तास आमच्या ‘बैठकीत’ असतो, याचा लेखाजोखाही ते खासगीत उघड करतात. बुकींची ही वल्गना थेट अमरावतीपर्यंत पोहोचल्याने आता भूखंड माफियांच्या या तपासावर विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाचेही लक्ष राहणार आहे. त्यांच्या स्तरावरूनही चौकशीचे डे-टू-डे अपडेट घेतले जाणार असल्याचे सांगितले जाते.
बँकांतील कर्जाचा पैसा क्रिकेट सट्ट्यात
लतेश हा क्रिकेट सट्ट्याचा शौकिन होता. तीन वर्षापूर्वी त्याला एका धाडीत अटकही करण्यात आली होती. या क्रिकेट सट्ट्यात पैसा हरल्यानेच त्याने भूखंड हडपणे व त्यावर कर्ज उचलण्याचे प्रताप सुरू केले. शिक्षकाच्या भूखंडावर उचललेले कोट्यवधींचे कर्जसुद्धा या क्रिकेट सट्ट्यातच लावले गेल्याची माहिती आहे. ‘रानो व बंटी’ हे यवतमाळातील प्रमुख क्रिकेट बुकी म्हणून ओळखले जातात. त्यांच्याकडे हा बहूतांश पैसा गेल्याची चर्चा आहे.

Web Title: Bunker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.