१० सचिवांवर ६८ सहकारी संस्थांचे ओझे
By admin | Published: July 17, 2016 12:44 AM2016-07-17T00:44:56+5:302016-07-17T00:44:56+5:30
जिल्हा बँकेशी संलग्नित असलेल्या तालुक्यातील ६८ विविध ग्राम कार्यकारी संस्थाचा कारभार केवळ १० गटसचिवाच्या भरवशावर सुरू आहे.
कर्ज वाटपासाठी कसरत : चार सेवानिवृत्त सचिवांचा हातभार
वणी : जिल्हा बँकेशी संलग्नित असलेल्या तालुक्यातील ६८ विविध ग्राम कार्यकारी संस्थाचा कारभार केवळ १० गटसचिवाच्या भरवशावर सुरू आहे. त्यामुळे ऐन कर्ज वाटपाच्या हंगामात हे गटसचिव कामाच्या ओझ्याखाली दबून जातात; मात्र जिल्हा बँकेकडून रिक्त जागांसाठी गटसचिवांची नेमणूक होत नसल्याने चार सेवानिवृत्त गटसचिवांचा आधार घेऊन कर्ज वाटपाचा व वसुलीचा कारभार करावा लागत आहे.
तालुक्यात ६८ विविध ग्राम सहकारी संस्था आहेत. जवळपास ९० टक्के शेतकरी या संस्थांचे सभासद आहेत. जिल्हा बँक या सहकारी संस्थामार्फत शेतकऱ्यांना कृषी कर्जाचे वितरण करते. त्यामुळे मोठ्या संस्थेसाठी एक, तर लहान दोन संस्था मिळून एक, असे गटसचिव नेमण्यात आले होते. जिल्हा बँकेच्या कर्ज वाटपासाठी मदत करणे व उत्पन्न निघाल्यानंतर शेतकऱ्यांकडून कर्ज वसुली करणे हे कार्य गटसचिव करतात. मात्र गेल्या सात-आठ वर्षात बरेच गटसचिव सेवानिवृत्त झाले. आता केवळ १० गटसचिव कार्यरत आहेत, तर चार सेवानिवृत्त गटसचिव जवळपास २५ सहकारी संस्थाचा कारभार सांभाळत आहे. त्यामुळे हंगामात कर्जवाटप करताना गटसचिवांची धांदल उडते. तुटपुंज्या वेतनामध्ये एकावेवेळी चार-पाच संस्थाचा कारभार सांभाळताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागते. आर्थिक बाबींशी संबंध असल्याने डोळ्यात तेल घालून काम करावे लागते. तरीही गटसचिवांनी सर्व शेतकऱ्यांना वेळेवर कर्जवाटप केले आहे. सेवानिवृत्तांना चार ते पाच हजार रूपये प्रति महिन्यातच काम करावे लागते. (स्थानिक प्रतिनिधी)