वीज कंपनीच्या कामांचे ओझे नवशिक्यांवर
By admin | Published: October 17, 2015 12:40 AM2015-10-17T00:40:49+5:302015-10-17T00:40:49+5:30
कुठल्याही प्रकारची जोखमीची कामे सोपविताना संबंधिताला प्रशिक्षण दिले जाते. अनुभवी व्यक्तीच्या हाताखाली त्याला काम करण्याची सूचना केली जाते.
युवक ठरताहेत बळी : कुठल्याही प्रशिक्षणाशिवाय सोपविली जातात कामे
यवतमाळ : कुठल्याही प्रकारची जोखमीची कामे सोपविताना संबंधिताला प्रशिक्षण दिले जाते. अनुभवी व्यक्तीच्या हाताखाली त्याला काम करण्याची सूचना केली जाते. मात्र विद्युत कंपनीतील कारभार यापेक्षा वेगळा आहे. याचे बळी नवयुवक ठरत आहे. कामाचा तात्पुरता अनुभव असलेल्या कंत्राटी कामगारांकडून जोखमीची कामे करून घेण्यात येत आहे. यवतमाळ जिल्ह्यात नवीन कामगारांचे अनेक बळी गेलेले असताना त्यातून धडा घेतला जात नाही.
आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांना विद्युत कंपनीत मानधन तत्त्वावर कामावर घेतले जाते. केवळ प्रमाणपत्रच त्यांचा अनुभव असतो. मानधनही अतिशय कमी दिले जाते. सहा ते सात हजार रुपये महिन्यावर त्यांचा रोजगार सुरू होतो. गरज असल्यामुळे त्यांचा जीवाशी खेळ सुरू होतो. याचेच ते बळी ठरत आहे. विद्युत खांबावर चढणे, वीज पुरवठा सुरळीत करणे, नवीन लाईन टाकणे आदी प्रकारची कामे अधिकारी किंवा वरिष्ठ कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत करून घेतली जावी, अशा सूचना आहे. परंतु विद्युत कंपनीच्या बहुतांश कार्यालयात प्रामुख्याने ग्रामीण भागात ही दक्षताच घेतली जात नाही.
अनुभवी कर्मचारी संपूर्ण कामाची जबाबदारी मानधन तत्त्वावर ढकलून देत असल्याची ओरड आहे आणि ती खरीही असल्याचे अनेक ठिकाणी निदर्शनास येते. जोखमीची कामे करत असताना झालेल्या थोड्याही चुकीमुळे नवीन कामगारांचे बळी गेल्याच्या घटना घडलेल्या आहेत. गुरुवारी बाभूळगाव येथे अशीच एक घटना घडली. विजेच्या खांबावरून अप्रशिक्षित कामगार कोसळला. त्याला गंभीर दुखापत झाली. यापूर्वीही अनेक ठिकाणी घडलेल्या गंभीर घटनांबाबत विद्युत कंपनी गंभीर नाही. एकूणच विद्युत कंपनीच्या कामाचे ओझे कंत्राटी कामगारांना वाहून न्यावे लागत आहे. (वार्ताहर)
कामगारांवरही कारवाई आणि शिक्षा
विद्युत कंपनीत मानधन तत्त्वावर काम करणाऱ्या व्यक्तीला अपघात झाल्यास कारवाईची कुऱ्हाड कनिष्ठ कामगारांवर कोसळते. वरिष्ठ अधिकारी सहीसलामत यातून सुटून जातात. अशाच काही प्रकरणात कनिष्ठ कामगारांवर निलंबनाची कारवाई प्रसंगी शिक्षाही झालेली आहे. मानधन तत्त्वावर काम करणाऱ्या लोकांना मानधनाशिवाय कुठलाही अतिरिक्त भत्ता किंवा अपघात झाल्यास भरपाई मिळत नाही. अशावेळी त्यांचे संपूर्ण कुटुंब उघड्यावर येते. यावर उपाय म्हणजे त्यांना योग्य ते प्रशिक्षण द्यावे, अनुभवी लोकांच्या उपस्थितीतच कामे करण्याची सूचना द्यावी हा असल्याचे खुद्द विद्युत कर्मचाऱ्यांकडून बोलले जाते.