तस्करीसाठी पेटविला जातो जंगलात वणवा

By admin | Published: March 1, 2015 02:08 AM2015-03-01T02:08:44+5:302015-03-01T02:08:44+5:30

सागवान तस्करी आणि वनविभागाचे अपयश झाकण्यासाठी जंगलाला वणवा लावण्याचा नवा फंडा पैनगंगा अभयारण्यात अलिकडील काही वर्षात सुरू आहे.

Burned for smuggling | तस्करीसाठी पेटविला जातो जंगलात वणवा

तस्करीसाठी पेटविला जातो जंगलात वणवा

Next

उमरखेड : सागवान तस्करी आणि वनविभागाचे अपयश झाकण्यासाठी जंगलाला वणवा लावण्याचा नवा फंडा पैनगंगा अभयारण्यात अलिकडील काही वर्षात सुरू आहे. सागवान तस्कर आणि वन कर्मचाऱ्यांच्या संगनमतातून होणारी चोरी पद्धतशीरपणे दडपली जात आहे. तर वनवा लावल्याचा आरोप मात्र सरपण गोळा करणाऱ्या गोरगरिबांवर लावल्या जातो.
उमरखेड तालुक्यात पैनगंगा अभयारण्या आले. या अभयारण्यात मौल्यवान सागवानासह बहुमूल्य वनौषधी आहेत. या जंगलात स्थानिक चोरट्यांसह आंध्र प्रदेश आणि मराठवाड्यातील सागवान तस्करांचा मुक्त संचार असतो. चोरट्यांनी सागवान तोडल्यानंतर या ठिकाणी झाडाचे बुंधे कायम असतात. यामुळे चोरी उघड होण्याची भीती असते. हा प्रकार उघडकीस आल्यास वन कर्मचारीही अडचणीत येऊ शकतात. म्हणून हा प्रकार दडपण्यासाठी जंगलाला आग लावून दिली जाते. मात्र हा वणवा असल्याचे भासविले जाते. वणव्यामुळे मोठ्या प्रमाणात वृक्ष जळतात तसेच वन्य प्राणीही आगीच्या भक्ष्यस्थानी पडतात. वन विभाग वणवा लागल्यानंतर उपाय योजना करतात. मात्र तोपर्यंत वणवा मोठ्या प्रमाणात भडकलेला असतो आणि हेच वनकर्मचाऱ्यांना हवे असते. पैनगंगा अभयारण्यात अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात सागवान तस्करी वाढली आहे. तस्कर एवढे शिरजोर झाले आहे की, ते कुणालाही जुमानत नाही. वन कर्मचाऱ्यांवरही हात उगारायला मागेपुढे पाहत नाही. दराटीच्या जंगलात एका वनरक्षकाला झाडाच्या बुंध्याला रात्रभर तस्करांनी बांधून ठेवले होते.
या प्रकारामुळे प्रामाणिक कर्मचारी गस्तच घालत नाही. आणि हितसंबंध गुंतलेले कर्मचारी तस्करांच्या दावणीला बांधलेले असतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या भागाचा दौरा केला तर जंगलात कापलेली झाडे दिसून येतील. परंतु कुणी वरिष्ठही लक्ष देत नाही, उलट सरपण गोळा करणाऱ्यांची नावे पुढे केली जातात. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Burned for smuggling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.