म्हसोला पुलावरून बस नदीत कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 22:12 IST2018-08-26T22:11:38+5:302018-08-26T22:12:17+5:30
तालुक्यातील पहूर येथून आर्णीकडे येणारी एसटी महामंडळाची बस म्हसोला येथील पुलावरून नदीत कोसळली. या अपघातात वाहकासह सात जण जखमी झाले. ही घटना रविवारी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली.

म्हसोला पुलावरून बस नदीत कोसळली
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : तालुक्यातील पहूर येथून आर्णीकडे येणारी एसटी महामंडळाची बस म्हसोला येथील पुलावरून नदीत कोसळली. या अपघातात वाहकासह सात जण जखमी झाले. ही घटना रविवारी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली.
दारव्हा आगाराची बस (क्र.एम.एच.०६-एस-८१३८) शनिवारी रात्री पहूर येथे मुक्कामी होती. नेहमी प्रमाणे ही बस रविवारी सकाळी तेथून आर्णीकडे येत होती. दरम्यान म्हसोला गावाजवळील पुलावर पुराचा गाळ साचलेला होता. या गाळावरून बस घसरत गेल्याने ती खाली नदीत कोसळली. या अपघातात स्नेहलता मधुकर पेटकर (७३), यश केशव उके (४), वाहक राठोड यांच्यासह जय प्रवीण पेटकर, कार्तिक संजय पेटकर, क्रिष अविनाश पेटकर, केशव बापुराव उके, जयश्री केशव उके हे जखमी झाले.
जखमींना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.