बस उलटून ३० विद्यार्थी जखमी
By Admin | Published: August 2, 2016 01:31 AM2016-08-02T01:31:56+5:302016-08-02T01:31:56+5:30
रस्त्यावरील गुरे चुकवून मार्ग काढण्याच्या प्रयत्नात एसटी बस उलटून झालेल्या अपघातात ३०
राळेगाव : रस्त्यावरील गुरे चुकवून मार्ग काढण्याच्या प्रयत्नात एसटी बस उलटून झालेल्या अपघातात ३० विद्यार्थ्यांसह प्रवासी जखमी झाले. ही घटना सोमवारी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास राळेगावजवळ घडली. अपघातातील नऊ गंभीर जखमींना उपचारासाठी यवतमाळ येथे हलविण्यात आले.
राळेगाव-कापसी-राळेगाव या राळेगाव आगाराच्या एमएच ४० वाय ५३३८ क्रमांकाच्या बसला हा अपघात झाला. ही बसफेरी राळेगाव येथे शाळा, महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सोडली जाते. सोमवारी सकाळी कापसी ते राळेगाव मार्गावर असलेल्या विविध गावांमधील विद्यार्थी आणि प्रवाशांना घेऊन राळेगावकडे येत होती. यामध्ये विद्यार्थ्यांसह ५० प्रवासी होते.
दरम्यान, गुरे चुकविण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या खाली उतरली. चिखल असल्याने उलटली. त्यामुळे प्रवासी एकमेकांवर आदळून जखमी झाले. बसच्या मुख्य प्रवेशव्दारातून प्रवासी बाहेर पडले. या घटनेत स्रेहा भोंग, पीयूष डोंगरे, निकीता लोणारे, श्याम डोंगरे, संकेत पारिसे, अरुणा खडसे, गजानन राऊत, निकीता पिसे, पूजा आडे या विद्यार्थ्यांना गंभीर दुखापत झाली. तसेच प्रतीक्षा नागपुरे, दीक्षा राजकोल्हे, साक्षी कुकरे, मनोज निमसरकर, संस्कृती मानकर, भूमी गोटे, कोमल डोंगरे, प्रगती नान्ने, प्रिया उमाळे, साक्षी तेलंग, वैशाली नागपुरे, स्वाती वानखेडे, संविधान धनवीज, करिष्मा कापटे, महिमा परचाके, विकास कापटे, अनिता खुराना, किसन खोडेकर, दीक्षा गोटे यांना किरकोळ दुखापत झाली. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून सुटी देण्यात आली. या घटनेप्रकरणी चालक एस.पी. किन्नाके याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.
बस उलटल्याची माहिती मिळताच कापसी, रामतीर्थ, वालदूर, कळमनेर येथील पालक, स्थानिक शाळांचे शिक्षक आदींची रुग्णालयात गर्दी झाली होती. घटनास्थळाला पोलीस दाखल झाले. पोलीस निरीक्षक अरूण आगे, उपनिरीक्षक अशोक सोळंकी यांनी घटनेचा पंचनामा केला. (प्रतिनिधी)