पुसद बसस्थानकावर अवकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 01:00 AM2017-07-23T01:00:33+5:302017-07-23T01:00:33+5:30
येथील बसस्थानकावर अवकळा आली असून सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
घाणीचे साम्राज्य : प्रवाशांची गैरसोय, चोरट्यांचा हैदोस
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : येथील बसस्थानकावर अवकळा आली असून सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. बसस्थानकात प्रवेश करताना आणि बाहेर पडताना दुर्गंधीने प्रवाशांचे स्वागत होत आहे.
दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या कार्यकाळात ७० च्या दशकात येथे बसस्थानकाची भव्य वास्तू उभारण्यात आली. जिल्ह्यातील हे दुसऱ्या क्रमांकाचे बसस्थानक होते. मात्र सध्या या बसस्थानकाला विविध गैरसोयींनी ग्रासले आहे. मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश करताच दोन्ही बाजूला कचऱ्याचे ढिगारे दृष्टीस पडतात. प्रवेशद्वारासमोरील घाणीच्या दुर्गंधीचा नागरिकांना सामना करावा लागतो. या परिसरात खुलेआम अवैध प्रवासी वाहने उभी असतात. परिसरात वराह आणि मोकाट जनावरांचा मुक्तसंचार असतो. प्रवाशांना चौकशी कक्षातील कर्मचारी कधीही शांतपणे माहिती देत नाही. आगार प्रशासनाचेही याकडे दुर्लक्ष होत आहे.
बसस्थानक परिसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. येथील स्वच्छतागृह एका खासगी संस्थेला चालविण्यास देण्यात आले. तेथील कर्मचारी प्रवाशांकडून मनमानी पद्धतीने पैसे वसूल करतात. मात्र त्या प्रमाणात कोणत्याही सुविधा दिल्या जात नाही. दरफलकही लावण्यात आला नाही. येथून तालुक्यातील हजारो विद्यार्थी दररोज ये-जा करतात. मात्र त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने येथे कोणतीही उपाययोजना नाही. विशेष म्हणजे ऐनवेळी बस रद्द होत असल्याने अनेक विद्यार्थ्यांचे हाल होतात.
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी येथे पोलीस चौकी असली तरी त्यात पोलीस कधीच दिसत नाही. त्यामुळे भामटे, टवाळखोरांचा सतत हैदोस सुरू असतो. अवैध वाहतूकदारांचा तर बसस्थानकाला सतत विळखा असतो. प्लॅटफॉर्मवरून प्रवासी नेणारे एजंटही बिनधास्तपणे आपले काम आटोपतात. कॅन्टीनमध्येही स्वच्छता नावालाच उरली. जादा दराने खद्य पदार्थ विकले जातात. तेथील सांडपाणी बाहेर साचून परिसरात दुर्गंधी पसरली आहे. यामुळे प्रवासी वैतागले आहेत.
‘बहुजन हिताय’ला एसटी महामंडळाची बगल
‘बहुजन हिताय-बहुजन सुखाय’ असे ब्रीद घेवून एसटी महामंडळ कार्यरत आहे. मात्र येथील बसस्थानकात प्रवाशांना धड सुविधाही मिळणे कठीण झाले आहे. आगार प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे बसस्थानक परिसराला विविध समस्यांनी घेरले आहे. दोन मुख्यमंत्री देणाऱ्या पुसद तालुकास्थळाचे बसस्थानक चर्चेचा विषय झाले आहे. प्रवाशांसह विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. एसटी महामंडळ या समस्यांकडे लक्ष देण्यास तयार नसल्याने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
चोऱ्यांचे प्रमाण वाढले
येथील बसस्थानकात चोऱ्या आणि पाकिटमारीचे प्रमाण वाढल्याचे सौरभ अग्रवाल या विद्यार्थ्याने सांगितले. पोलिसांनी चोरट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी त्याने केली. महिलांच्या छेडखानीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बसस्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी व्यापारी किशोर जाजू यांनी केली. या परिसरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची सूचना शिक्षक विजय कडू यांनी केली. तसेच टवाळखोरांचा हैदोस थांबवून प्रवाशांना सुरक्षितता प्रदान करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.