यवतमाळ बाजार समितीत व्यापाऱ्याची मनमानी

By admin | Published: December 30, 2015 02:58 AM2015-12-30T02:58:43+5:302015-12-30T02:58:43+5:30

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत पूर्णत: व्यापाऱ्यांची मनमानी सुरू आहे. शेतमाल घेऊन आलेल्या शेतकऱ्यांचा क्रमवारीनेच लिलाव करणे अपेक्षित असताना ....

Businessman's arbitrariness in the Yavatmal market committee | यवतमाळ बाजार समितीत व्यापाऱ्याची मनमानी

यवतमाळ बाजार समितीत व्यापाऱ्याची मनमानी

Next

तुरीचे भाव पाडले : मुक्कामी शेतकऱ्यांच्या मालाचा लिलाव नाही
हिवरी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत पूर्णत: व्यापाऱ्यांची मनमानी सुरू आहे. शेतमाल घेऊन आलेल्या शेतकऱ्यांचा क्रमवारीनेच लिलाव करणे अपेक्षित असताना व्यापारी मनात येईल तेथून मालांचा लिलाव करतात. सोमवारी सकाळी तुरी घेऊन आलेल्या शेतकऱ्यांच्या मालाचा लिलावच केला नाही. मंगळवारीही दुपारी उशिरा त्याच दिवशी आलेल्या शेतमालाचा लिलाव केला. लिलाव करताना व्यापाऱ्यांनी तब्बल दीड हजार रुपयांनी तुरीचे भाव कमी केले आहे.
यवतमाळ तालुक्यातील भांबराजा येथून विलास कोवरे, पुंडलिक राऊत, प्रकाश सोनकर, बारडतांडा येथून पंकज पवार, भारत जाधव, पिंपळगाव येथून मिलिंद गावंडे, लोणी येथून शिवलाल पवार, करळगाव येथून विश्वनाथ ठाकरे, मडकोना येथून शंकर गुल्ले, भास्कर धोटे, सुरज धोटे, रामचंद्र मेश्राम, विलास लोकासे, ईश्वर पेंदोर, बोरगाव लिंगा येथून श्रीकृष्ण घाटे, हरिशचंद्र ढोरे हे शेतकरी तूर विकण्यासाठी सोमवारी सकाळीच आठवड्याचा पहिलाच दिवस म्हणून बाजार समितीत आले. मात्र व्यापाऱ्यांनी त्या दिवशी त्यांच्या तुरीचा लिलावच केला नाही. शेतकऱ्यांनी जाब विचारला असता उडवाउडवीची उत्तरे देवून त्यांना परतवून लावले. मंगळवारी दुपारी लिलाव होणे अपेक्षित होता. मात्र याही दिवशी उशिरा ३ ते ४ वाजता लिलावाला सुरुवात केली. त्यातही सोमवारपासून मुक्कामी असलेल्या शेतकऱ्यांना वगळून सुरुवातीला मंगळवारी आलेल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाचा लिलाव करण्यात आला. मुक्कामी असलेल्या शेतकऱ्यांनी जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता जाणीवपूर्वक तुरीचे भाव कमी करण्यात आले. सोमवारपर्यंत नऊ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल दराने जात असलेली तूर मंगळवारी चक्क आठ हजार ३७० रुपयाने खरेदी केली. एका दिवशी हजार ते १५०० रुपयांची तूट व्यापाऱ्यांनी आणली.
बाजार समितीत प्रशासक नेमले असून त्यांच्याकडून कोणतीच कारवाई केली जात नाही. येथील सचिव व कर्मचारीवर्गसुद्धा पूर्णत: व्यापारीधार्जीना आहे. अडते व व्यापाऱ्यांचे हितसंबंध जोपासण्याचे काम या बाजार समितीत केले जात आहे. शेतमाल विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना कसे नाडवता येईल, याचाच पुरेपूर प्रयत्न येथील यंत्रणेकडून केला जातो. शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील बाजार समितीत शेतकऱ्यांची होत असलेली पिळवणूक नित्याचीच झालेली आहे. या बाबत तक्रारी करूनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही. शेतमालाची खरेदी करताना अडते व व्यापारी आपल्या मर्जीनेच कारभार करतात. बाजार समितीत शेतकरी हितासाठी कोणतीच नियमावली नाही. यातूनच मोठी अनागोंदी येथे सुरू आहे, असा आरोप मुक्कामी असलेल्या शेतकऱ्यांनी केला आहे. (वार्ताहर)

Web Title: Businessman's arbitrariness in the Yavatmal market committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.