वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेसाठी थेट जमीन खरेदी
By admin | Published: August 11, 2016 12:57 AM2016-08-11T00:57:53+5:302016-08-11T00:57:53+5:30
जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या वर्धा-यवतमाळ-नांंदेड रेल्वे मार्गातील भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लागला असून
अधिकाऱ्यांना प्रशिक्षण : कामाला गती
यवतमाळ : जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या वर्धा-यवतमाळ-नांंदेड रेल्वे मार्गातील भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लागला असून भूसंपादन विभागाने थेट जमीन खरेदीच्या दृष्टीने पावले उचलली आहे. जमीन खरेदीची प्रक्रिया युद्ध पातळीवर पूर्ण करण्यासाठी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि मंडळ अधिकाऱ्यांची कार्यशाळा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी घेण्यात आली.
लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या प्रकल्पाला फेब्रुवारी २००८ मध्ये मान्यता मिळाली होती. त्यानंतर यवतमाळ येथे ११ फेब्रुवारी २००९ रोजी तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. मात्र या रेल्वे प्रकल्पात भूसंपादनाचा मोठा अडसर येत होता. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन रेल्वेच्या विशेष योजनेत या प्रकल्पाचा समावेश करण्याची मागणी केली होती. २ जून रोजी रेल्वे मंत्रालयाने यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून या प्रकल्पाला विशेष रेल्वे प्रकल्पाचा दर्जा दिल्याचे जाहीर केले. रेल्वे कायद्यांतर्गत विहीत मुदतीत दोन वर्षात जमीन अधिग्रहण करणे यामुळे बंधनकारक झाले. तसेच रेल्वे प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी थेट खरेदीचा प्रस्तावही पुढे आला. यासाठी १२ मे २०१५ च्या सरळ खरेदी कायद्याचा अवलंब करण्यात येणार आहे. या कायद्याची अंमलबजावणी करताना कुठली खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. भूसंपादन अधिनियम २०१३, रेल्वे अॅक्ट १९८९ राष्ट्रीय महामार्ग १९५६ कायद्यात कुठल्याबाबी आल्या आहेत. त्याची अंमलबजावणी करताना कोणते बारकावे लक्षात घेण्याची आवश्यकता आहे, याची माहिती देण्यासाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची कार्यशाळा घेण्यात आली.
जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांच्या अध्यक्षतेत ही कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेला प्रकल्पाचे जिल्हा समन्वयक भूसंपादन अधिकारी विजय भाकरे यांच्यासह रेल्वे मार्गाशी संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी उपस्थित होते. त्यांना यावेळी प्रशिक्षण देण्यात आले. या बैठकीला रेल्वेचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. आता रेल्वे मार्गाच्या कामाला गती मिळणार आहे. (शहर वार्ताहर)
ड्रीम प्रोजेक्ट
शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्याच्या विकासाला बळ देणारा वर्धा-यवतमाळ-नांदेड हा रेल्वे मार्ग ड्रीम प्रोजेक्ट आहे. यासाठी लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा, खासदार भावना गवळी यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. तसेच रेल्वे अर्थसंकल्पातही या प्रकल्पासाठी अधिकाधिक निधी मिळविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडेही पाठपुरावा केला.