तूर खरेदी करा अन्यथा मंत्र्यांच्या घरी आसूड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 10:02 PM2018-05-23T22:02:29+5:302018-05-23T22:02:29+5:30
तूर खरेदीसाठी शेतकरी रांगेत उभा आहे. २६ मेपर्यंत तूर घ्या, नाहीतर पालकमंत्र्यांच्या घरी आसूड घेऊन जाऊ, असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला. आर्णी तालुक्याच्या दाभडी येथून निघालेली आसूड यात्रा बुधवारी येथे पोहोचली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : तूर खरेदीसाठी शेतकरी रांगेत उभा आहे. २६ मेपर्यंत तूर घ्या, नाहीतर पालकमंत्र्यांच्या घरी आसूड घेऊन जाऊ, असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला. आर्णी तालुक्याच्या दाभडी येथून निघालेली आसूड यात्रा बुधवारी येथे पोहोचली. या अंतर्गत फटाका मार्केटमध्ये सभा घेण्यात आली. यावेळी आमदार कडू यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ असे आश्वासन देण्यासोबतच सरकारच्या धोरणावर टीका केली.
यावेळी मंचावर ‘प्रहार’चे राज्य संपर्क प्रमुख प्रमोद कुदळे, जिल्हाध्यक्ष नितीन मिर्झापुरे, अतुल पाटील खुपसे, नितीन गढिया, अंकुश वानखडे, गोपाल चव्हाण, सतीश चवात, बंडू बोरकर, स्वप्नील मातारे, सैयद इरशाद, बंटी पठाण, सोजेल पठाण आदी उपस्थित होते.
आमदार कडू म्हणाले, सततच्या नापिकीने देशाचा पोशिंदा हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांना शिव्या हासडणाऱ्यांना त्यांचा रस्ता दाखवा, असे सांगत भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना हे पक्ष एकाच माळेचे मणी आहे, असे ते म्हणाले. प्रत्येक मतदारसंघात अपक्ष बच्चू तयार करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. शेतकऱ्यांसाठी तुरीचे आंदोलन करू असे त्यांनी सांगितले. या सभेचे संचालन संतोष अरसोड यांनी केले.