पालिका विद्यार्थ्यांसाठी गणवेश खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 10:15 PM2018-08-10T22:15:12+5:302018-08-10T22:16:29+5:30
नगरपरिषदेच्या स्थायी समितीची तहकूब सभा शुक्रवारी झाली. या बैठकीत पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, नोटबुक आणि ड्यूल डेस्क खरेदीला मान्यता देण्यात आली. आरोग्य, विद्युत विभागातील विषयही मंजूर करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : नगरपरिषदेच्या स्थायी समितीची तहकूब सभा शुक्रवारी झाली. या बैठकीत पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, नोटबुक आणि ड्यूल डेस्क खरेदीला मान्यता देण्यात आली. आरोग्य, विद्युत विभागातील विषयही मंजूर करण्यात आले.
३१ जुलै रोजी आयोजित स्थायी समिती सभा तहकूब करण्यात आली होती. या बैठकीत अजेंड्यावरील नऊ मुद्यांवरच चर्चा झाली. त्यानंतर ही सभा तहकूब झाली होती. उर्वरित विषयांना मंजुरी देण्यासाठी शुक्रवारी सभा घेण्यात आली. या सभेत किरकोळ निविदांना मंजुरी देण्यात आली. यात फोटोग्राफी, स्टेशनरी खरेदी, बिछायत, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागांवर वारसा हक्काने नियुक्ती, विविध कॉलनीतील मंदिर परिसरात असलेल्या सभागृहांची भाडे आकारणी करण्याचा निर्णय घेतला. जेणेकरून या सभागृहांची देखभाल दुरूस्ती व स्वच्छता नियमित करता येईल.
शहरातील मोकाट जनावरे पकडण्यासाठी तहसील चौक, वंजारी फैल, लोहारा, वडगाव, भोसा येथील कोंडवाडे दुरूस्तीचा ठराव मान्य करण्यात आला. जेसीबी आॅपरेटर व फॉगिंग मशीन आॅपरेटरचे कंत्राट काढणे, तसेच प्रत्येक झोनमध्ये स्वतंत्र फॉगिंग मशीन देण्याचा प्रस्ताव आरोग्य सभापती दिनेश चिंडाले यांनी ठेवला. यालाही मान्यता देण्यात आली. आरोग्य विभागाची वाहन दुरूस्तीसह सावरगड येथील ओडब्ल्यूसी मशीन दुरूस्त करून चालविण्यास देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. यामुळे शहरातील स्लॉटर वेस्टपासून खत निर्मिती करता येणार आहे.
पथदिवे कंत्राटदार नागपुरात काळ्या यादीत
पथदिवे साहित्यासह देखभाल दुरूस्ती निविदेवर काँग्रेसच्या वैशाली सवाई यांनी आक्षेप घेतला. सदर कंत्राटदाराला नागपुरात ‘ब्लॅक लिस्टेड’ केल्याचे सांगितले. यावर सभागृहाने मुख्याधिकारी व नगराध्यक्षांनी सखोल चौकशी करून या निविदेचा निर्णय घ्यावा, असे सुचविले. बैठकीत सर्वच विषयांना मंजुरी देण्यात आली. पहिल्यांदाच बैठक मुद्देसूद चर्चा आणि आरोप प्रत्यारोपाविना पार पडली.
गाळ्यांसाठी फेरनिविदा
आठवडी बाजारातील संकुलात बांधलेले गाळे अनामत रक्कम भरुनही ताब्यात घेतले नाही. चर्चेलाही प्रतिसाद मिळाला नाही. या गाळ्यांचा फेरनिविदेने लिलाव करावा या प्रस्तावाला समितीने मान्यता दिली.