शस्त्रांची ऑनलाईन खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 10:32 PM2019-11-21T22:32:28+5:302019-11-21T22:35:03+5:30
यवतमाळात अल्पवयीन मुलांमध्ये शस्त्रांबाबत विशेष आकर्षण दिसून येते. शाळा, महाविद्यालय स्तरावर अल्पवयीन मुलेही घातक शस्त्रे बाळगून असल्याचे अनेक प्रकार उघड झाले आहे. आता तर शहरातील टोळ्यांमध्ये वर्चस्वासाठी जुळवाजुळव सुरू आहे. प्रतिस्पर्ध्यावर हल्ला करण्याची संधी या टोळ्या शोधत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरातील गुन्हेगारी जगतात वरकरणी शांतता दिसत असली तरी येत्या काळात मोठा भडका उडण्याची भीती आहे. राजकीय घडामोडींचा प्रभाव येथील गुन्हेगारी जगतावर राहिला आहे. अंतर्गत धूसफूस सुरू असून स्वसंरक्षणासाठी, वचपा काढण्याकरिता शस्त्रांची जमवाजमव केली जात आहे. परंपरागत पद्धतीने शस्त्र आणण्याऐवजी आता थेट ऑनलाईन खरेदीला पसंती दिली जात आहे. यवतमाळ शहरात ब्रॅन्डेड शस्त्रांना चांगली डिमांड असल्याचे एका ऑनलाईन शॉपी अॅपने प्रसिद्ध केले आहे.
यवतमाळात अल्पवयीन मुलांमध्ये शस्त्रांबाबत विशेष आकर्षण दिसून येते. शाळा, महाविद्यालय स्तरावर अल्पवयीन मुलेही घातक शस्त्रे बाळगून असल्याचे अनेक प्रकार उघड झाले आहे. आता तर शहरातील टोळ्यांमध्ये वर्चस्वासाठी जुळवाजुळव सुरू आहे. प्रतिस्पर्ध्यावर हल्ला करण्याची संधी या टोळ्या शोधत आहे. पोलीस कारवाईपासून वाचण्यासाठी थेट शस्त्रांची ऑनलाईन खरेदी सुरू आहे. वर्षभरापूर्वी एकाने चक्क अमृतसर येथून पोस्टाच्या पार्सलमधून धारदार तलवारी बोलाविल्या होत्या. या पार्सलचे कव्हर फाटल्याने हा प्रकार उघड झाला. मात्र त्यानंतरही गुन्हेगारी जगतातील मोठ्या प्रमाणात शस्त्र बोलावण्याचे सत्र सुरू आहे. स्नॅपडिल या ऑनलाईन शॉपींग अॅपने यवतमाळ शहराला तर गुड रिमार्क दिला आहे. या शहरातून मोठ्या प्रमाणात शस्त्र खरेदी होत असल्याचे त्यांनीच जाहीर केले आहे. स्नॅपडीलवर धारदार काटे असलेल्या ११०० चाकूचे बुकींग करण्यात आले. त्यापैकी सात चाकू यवतमाळातून मागविले आहे.
गुन्हेगारी जगतातील अंतर्गत कुरघोड्या लक्षात घेता काहींनी अवैध शस्त्र विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. आॅनलाईन शस्त्र खरेदी करायचे व येथे त्याची दुप्पट दरात विक्री करायची हा व्यवसाय जोरात सुरु आहे. चाकू, तलवार यासोबतच अग्नीशस्त्राचीही उलाढाल मोठ्या प्रमाणात होत आहे.
युवक काँग्रेसचे पोलिसांना निवेदन
स्नॅपडील या ऑनलाईन खरेदी अॅपवरुन चाकू यवतमाळात येत असल्याबाबत युवक काँग्रेसच्या ललित जैन यांनी एलसीबी प्रमुख प्रदीप शिरस्कर यांना निवेदन दिले. हा गंभीर प्रकार असून स्नॅपडीलने सूपरहीट यवतमाळ अशी टॅग लाईन टाकून सात चाकू विकल्या गेल्याचे जाहीर केले आहे. हा प्रकार युवक काँग्रेसच्या सदस्यांनी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला आहे. याबाबत ठोस कारवाई करण्याची मागणी केली आहे.