यवतमाळ जिल्ह्यात ८६ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका; ५ जूनला मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2022 12:24 PM2022-05-06T12:24:58+5:302022-05-06T12:31:08+5:30
११४ प्रभागांतील १२८ जागांसाठी होणार निवडणूक, सर्वाधिक ग्रामपंचायती वणी तालुक्यात
यवतमाळ : राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील ८६ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका जाहीर केल्या आहेत. ५ जून रोजी याठिकाणी प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. याशिवाय जानेवारी ते डिसेंबर २०२२ पर्यंत कार्यकाळ संपणाऱ्या २१८ ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रमही जाहीर करण्यात आला आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील ८६ ग्रामपंचायतीमध्ये १२८ जागा रिक्त आहेत. या जागा विविध कारणाने रिक्त झाल्या आहेत. त्याठिकाणी विशिष्ट संवर्गातील उमेदवारासाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पाडली जात आहे. गुरुवारी तहसीलदारांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध केली. १३ ते २० मे पर्यंत ८६ ग्रामपंचायतीमध्ये उमेदवारांना नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार आहे. २३ मे रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी होणार आहे. २५ मे रोजी नामनिर्देशनपत्र मागे घेण्यासाठीची वेळ राखीव ठेवण्यात आली आहे. याच दिवशी दुपारनंतर चिन्ह वाटप होणार आहे. ५ जून रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. तर ६ जून रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. ९ जून रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होईल.
८६ ग्रामपंचायतीमध्ये वणी तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीमध्ये १७ जागांसाठी ही निवडणुकीची प्रक्रिया पार पडत आहे. याशिवाय यवतमाळ तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतीमध्ये १२ जागा, बाभूळगाव तालुक्यातील सात ग्रामपंचायतीमध्ये दहा जागा, नेर तालुक्यातील दोन ग्रामपंचायतीमध्ये तीन जागा, उमरखेड एक ग्रामपंचायत एक जागा, महागाव एक ग्रामपंचायत एक जागा, दिग्रस तीन ग्रामपंचायतीमध्ये चार जागा, घाटंजी सहा ग्रामपंचायतीमध्ये नऊ जागा, आर्णी दोन ग्रामपंचायतीमध्ये सहा जागा, दारव्हा १० ग्रामपंचायतीमध्ये ११ जागा, पुसद दहा ग्रामपंचायतीमध्ये १८ जागा, कळंब चार ग्रामपंचायतीमध्ये चार जागा, राळेगाव सात ग्रामपंचायतीमध्ये ११ जागा, केळापूर आठ ग्रामपंचायतीमध्ये ११ जागा आणि झरी तालुक्यात तीन ग्रामपंचायतीमध्ये दहा जागेसाठी ही निवडणुकीची प्रक्रिया पार पडणार आहे. ११४ प्रभागातील १२८ जागांसाठी ही निवडणूक घेतली जात आहे.