यवतमाळात प्रथमच बायपास हृदय शस्त्रक्रिया
By admin | Published: April 30, 2017 01:14 AM2017-04-30T01:14:12+5:302017-04-30T01:14:12+5:30
जिल्ह्याच्या वैद्यकीय सेवेत लौकिक वाढविणारी शस्त्रक्रिया झाल्याची माहिती येथे पत्रकार परिषदेत देण्यात आली.
यवतमाळ : जिल्ह्याच्या वैद्यकीय सेवेत लौकिक वाढविणारी शस्त्रक्रिया झाल्याची माहिती येथे पत्रकार परिषदेत देण्यात आली.
हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या धमण्यांमध्ये ब्लॉकेजेस निर्माण झाल्याने ५८ वर्षीय शेतकऱ्यावर बायपास शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते. हृदयरोग तज्ज्ञांनी नागपुरातील तज्ज्ञांच्या मदतीने यवतमाळातच ही शस्त्रक्रिया केल्याची माहिती डॉ. सतीश चिरडे यांनी दिली. उल्हास लच्छू राठोड (५८) रा. पाटापांगरा ता. घांटजी, असे त्याचे नाव आहे.
डॉ. सतीश चिरडे यांच्याकडे तो उपचारासाठी आला. मात्र एक हजार रूपयावर अधिकचा खर्च उपचारासाठी करणे शक्य नसल्याचे त्याने सांगितले. अशा स्थितीत चिरडे यांनी डॉ. सुरेखा येलनारे, डॉ. नीलेश येलनारे आणि नागपुरातील तज्ज्ञ डॉ. सौरभ वार्शिनेय, डॉ. पद्मजा देशपांडे, डॉ. शीतल मानकर यांच्या चमूने ही शस्त्रक्रिया येथेच करण्याचा निर्णय घेतला. पालकमंत्री मदन येरावार यांच्या सहकार्याने मुख्यमंत्री सहायता निधीतून एक लाख २५ हजार रूपयांची मदतही मिळाली. इतक्याच रकमेत डॉक्टरांनी येथील अत्याधुनिक शस्त्रक्रियागृहात ही शस्त्रक्रिया पूर्ण केली. सध्या उल्हास राठोड यांची प्रकृती ठणठणीत असून त्यांना दोन दिवसात सुटी देणार असल्याचे डॉ. चिरडे यांनी पत्रपरिषदेत सांगितले. (कार्यालय प्रतिनिधी)