सीएए कायद्यामुळे गरिबांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 06:00 AM2020-02-08T06:00:00+5:302020-02-08T06:00:15+5:30
आर्णी येथे गेल्या १४ दिवसांपासून शाहीन बागच्या धर्तीवर महिलांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला गुरुवारी अब्दूर रहेमान यांनी भेट दिली. त्यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी सीएए व एनआरसीसारखे कायदे देशाच्या एकतेला व एकात्मतेला बाधक ठरत असल्याचे सांगितले. आसाममध्ये एनआरसीच्या यादीत १९ लाख लोकांना वगळण्यात आले. यामध्ये सहा लाख मुस्लिम आणि १३ लाख इतर धर्मीय नागरिक आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : सीएए आणि एनआरसीसारख्या कायद्यांमुळे देशातील गरीब वर्गांचे मोठे नुकसान होणार आहे. त्याविरुद्ध सुरू असलेल्या शाहीन बाग आंदोलनाचे आता धगधगत्या विचारधारेत रूपांतर झाले आहे. त्यामुळे या कायद्याबद्दल फेरविचार करण्याची वेळ आल्याचे मत माजी आयपीएस अधिकारी अब्दूर रहेमान यांनी व्यक्त केले.
आर्णी येथे गेल्या १४ दिवसांपासून शाहीन बागच्या धर्तीवर महिलांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला गुरुवारी अब्दूर रहेमान यांनी भेट दिली. त्यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी सीएए व एनआरसीसारखे कायदे देशाच्या एकतेला व एकात्मतेला बाधक ठरत असल्याचे सांगितले. आसाममध्ये एनआरसीच्या यादीत १९ लाख लोकांना वगळण्यात आले. यामध्ये सहा लाख मुस्लिम आणि १३ लाख इतर धर्मीय नागरिक आहे. हे सर्व नागरिक आता नागरिकत्व सिद्ध करण्याकरिता धडपड करीत आहेत. यात त्यांच्या वेळेचा आणि पैशाचा अपव्यय होत आहे. विशेष म्हणजे, माजी राष्ट्रपती, कारगिल युद्धात लढलेले सैनिक, आसामचे मुख्यमंत्री, चंद्रयान-२ चे मुख्य सल्लागार अशा अनेकांच्या कुटुंबियांचा वगळण्यात आलेल्यांमध्ये समावेश आहे. त्यामुळे सामान्य मध्यमवर्गीयांना नागरिकत्व सिद्ध करताना कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
या कायद्यामुळे वेळीच सजग होवून दिल्लीत १२ महिलांनी शाहीन बाग येथे धरणे आंदोलन सुरू केले. ते आंदोलन आता देशभर पसरले आहे. ती एक विचारधारा म्हणून देशात रूजत आहे. त्यामुळे सरकारने वेळीच या कायद्यांचा फेरविचार करावा, असे आवाहन अब्दूर रहेमान यांनी केले.