मंत्रिपदाचे चेहरे ‘चेंज’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 05:00 AM2019-11-12T05:00:00+5:302019-11-12T05:00:21+5:30
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात भाजपच्या पाचही जागा कायम राहिल्या. या निवडणुकीपूर्वी प्राचार्य डॉ.अशोक उईके, मदन येरावार, संजय राठोड हे तीन मंत्री होते. नव्या मंत्रिमंडळात भाजप-सेनेचे सरकार बसेल, असे गृहीत धरून राठोड व येरावार या राज्यमंत्र्यांनी कॅबिनेटसाठी मोर्चेबांधणी चालविली होती. तर उईकेंनी आपल्याकडील आदिवासी विकास हे मंत्रिपद कायम राहावे, यासाठी प्रयत्न केले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : राज्यातील सत्तेचे समीकरण बदलताच जिल्ह्यात मंत्रिपदाचे संभाव्य चेहरेही बदलण्याची स्थिती निर्माण झाली आहे. भाजप-शिवसेनाऐवजी आता शिवसेना-राष्ट्रवादी असे नवे समीकरण जुळण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातून शिवसेनेच्या संजय राठोड यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या इंद्रनील नाईकांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता बळावली आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात भाजपच्या पाचही जागा कायम राहिल्या. या निवडणुकीपूर्वी प्राचार्य डॉ.अशोक उईके, मदन येरावार, संजय राठोड हे तीन मंत्री होते. नव्या मंत्रिमंडळात भाजप-सेनेचे सरकार बसेल, असे गृहीत धरून राठोड व येरावार या राज्यमंत्र्यांनी कॅबिनेटसाठी मोर्चेबांधणी चालविली होती. तर उईकेंनी आपल्याकडील आदिवासी विकास हे मंत्रिपद कायम राहावे, यासाठी प्रयत्न केले होते. परंतु राज्यात सत्तेचे चक्र फिरले आणि सर्वाधिक जागा मिळवूनही भाजपला विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली. राज्यात आता शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस असे सत्तेचे नवे समीकरण जुळण्याची चिन्हे आहेत. त्यांना काँग्रेस पक्ष बाहेरून पाठिंबा देण्याची शक्यता आहे. सोमवारी सायंकाळी झालेल्या घडामोडीत शिवसेनेला १४५ आमदारांच्या समर्थनाचे पत्र वेळेत राज्यपालांकडे सादर करता आले नाही. त्यांची वेळ संपली असली तरी राज्यपालांनी आता राष्ट्रवादीला निमंत्रण दिले. त्यामुळे आता पुढे हे ठरलेले समीकरण अस्तित्वात येण्याची चिन्हे आहेत.
नव्या समीकरणात शिवसेनेचे संजय राठोड यांचे मंत्रिपद पक्के आहे. उलट त्यांना कॅबिनेटपदावर बढती मिळण्याची शक्यता बळावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्ह्यातून विधान परिषद सदस्य तथा जिल्हाध्यक्ष ख्वाजा बेग, पुसदमधील नाईक बंगल्याचे नव्या पिढीचे वारसदार व पहिल्यांदाच निवडून आलेले इंद्रनील मनोहरराव नाईक ही दोन नावे प्रामुख्याने पुढे आहेत. ख्वाजा बेग यांचा आमदारकीचा अवघा वर्षभराचा कार्यकाळ शिल्लक असल्याने त्यांना मंत्रिपदावर संधी दिली जाईल की नाही, याबाबत राजकीय गोटात साशंकता आहे. परंतु इंद्रनील नाईक यांना मात्र नवा चेहरा म्हणून राष्ट्रवादीकडून जिल्ह्यातून मंत्रिमंडळात संधी दिली जाण्याची अपेक्षा त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केली जात आहे. प्रा.तानाजी सावंत यांचा विधानसभेवर निवडून गेल्याने यवतमाळशी आता तेवढा संबंध राहिला नसला तरी नव्या सरकारमध्ये त्यांचे कॅबिनेट मंत्रिपद निश्चित मानले जात आहे. काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा असल्याने ते सत्तेचे ‘लाभार्थी’ होणार नाही. जिल्ह्यात काँग्रेसचे दोन आमदार आहेत. मात्र एकाने अलिकडेच सेनेशी घरठाव केल्याने त्यांची काँग्रेसकडून संधी तशीही हुकल्याचे मानले जाते.
जिल्हा परिषदेतही सत्तेचे समीकरण बदलणार ?
जिल्हा परिषदेमध्ये सध्या काँग्रेस - शिवसेना व भाजप असे सत्तेचे समीकरण आहे. नव्या टर्ममध्ये भाजपला बाहेर ठेवून काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी सत्तेचे गणित मांडणार काय, याकडे नजरा लागल्या आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी भाजप-शिवसेना सत्तेत आहे. राज्यातील बदललेले समीकरण पाहता जिल्ह्यात विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येसुद्धा भाजपला विरोधी बाकावर बसविण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस असे सत्तेचे नवे समीकरण जुळविले जाईल का, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे.
यवतमाळ पॅटर्न राज्यात
यवतमाळ जिल्हा परिषदेत शिवसेनेला सर्वाधिक २० जागा मिळूनही भाजप-राष्ट्रवादी व काँग्रेसच्या अभद्र खेळीमुळे दोन वर्षे विरोधी बाकावर बसावे लागले होते. सहा महिन्यांपूर्वी ऐन विधानसभेच्या तोंडावर भाजप-सेना व काँग्रेस असे सत्तेचे नवे समीकरण मांडले गेले. हाच पॅटर्न राज्यात विधानसभेसाठी पाहायला मिळाला. भाजपने सर्वाधिक १०५ जागा मिळवूनही शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेसच्या खेळीमुळे भाजपला विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली आहे.