राळेगावला सत्तांतरातही कॅबिनेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 09:49 PM2019-06-16T21:49:10+5:302019-06-16T21:51:42+5:30
महाराष्ट्रात झालेल्या सत्तांतरानंतरही राळेगाव मतदारसंघाला कॅबिनेट मंत्रीपद मिळाले. काँग्रेसच्या काळात प्रा.वसंत पुरके तर, आता प्रा.डॉ.अशोक उईके यांच्या रूपाने मतदारसंघाला हा मान मिळाला आहे. डॉ.उईके यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याची वार्ता पोहोचताच समर्थकांनी फटाके फोडून, ढोल-ताशाच्या गजरात आनंद साजरा केला.
गजानन अक्कलवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब : महाराष्ट्रात झालेल्या सत्तांतरानंतरही राळेगाव मतदारसंघाला कॅबिनेट मंत्रीपद मिळाले. काँग्रेसच्या काळात प्रा.वसंत पुरके तर, आता प्रा.डॉ.अशोक उईके यांच्या रूपाने मतदारसंघाला हा मान मिळाला आहे. डॉ.उईके यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याची वार्ता पोहोचताच समर्थकांनी फटाके फोडून, ढोल-ताशाच्या गजरात आनंद साजरा केला.
राळेगाव मतदारसंघातून प्रा.डॉ. अशोक उईके यांनी पहिल्यांदा २००४ मध्ये शिवसेनेकडून निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांना ५३ हजार ४६८ मते मिळाली. प्रा.पुरके यांच्याकडून त्यांचा १० हजार ८५९ मतांनी पराभव झाला होता. २००९ मध्ये ते अपक्ष म्हणून रिंगणात होते. त्यावेळी त्यांच्या मतांचा टक्का घसरला. अशाही परिस्थितीत त्यांनी हार न मानता लोकांशी सतत संपर्क ठेवला. यानंतर २०१४ ची निवडणूक भाजपच्या तिकीटावर लढली. यात त्यांनी ४० हजारांच्यावर मताधिक्य घेऊन १५ वर्षांपासून मंत्रीपद भूषविलेल्या प्रा.पुरके यांचा पराभव केला. लोकसभा निवडणुकीत युतीच्या उमेदवार भावना गवळी यांना राळेगाव मतदारसंघात ३० हजारांच्या आसपास आघाडी मिळाली, हे विशेष.
डॉ.अशोक उईके हे १९९७ ते २००१ पर्यंत बुलडाणा नगरपरिषदेचे सदस्य होते. या नगरपरिषदेचे उपाध्यक्षपदही त्यांनी भूषविले. ते वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अभ्यागत मंडळाचे अध्यक्ष आहे. अनूसूचित जाती-जमाती समितीचे अध्यक्षपदही त्यांच्याकडे आहे. मतदार संघातील देवधरी येथे बिरसा मुंडा सहकारी सूतगिरणीची स्थापना त्यांनी केली. यामाध्यमातून स्थानिक लोकांना रोजगार देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. राळेगाव, कळंब, बाभूळगाव येथे त्यांनी सर्वाधिक नगरसेवक निवडून आणत आपल्या कार्याची छाप सोडली.
लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आमदार डॉ.अशोक उईके यांचे प्रामाणिक प्रयत्न राहिले. त्यांना मिळालेल्या मंत्रीपदामुळे मतदार संघातील विविध प्रश्न तातडीने मार्गी लागतील, अशी अपेक्षा जनतेला आहे. डॉ.अशोक उईके यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच कळंब, राळेगाव व बाभूळगाव तालुक्यातील अनेक गावात फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. पेढे वाढून आनंद व्यक्त करण्यात आला.