काळी येथे आरोग्य केंद्रच पडले आजारी
By admin | Published: March 20, 2017 12:28 AM2017-03-20T00:28:40+5:302017-03-20T00:28:40+5:30
महागाव तालुक्यातील काळी दौ. येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सध्या आजारी असल्याचे दिसत आहे.
मोहदी : महागाव तालुक्यातील काळी दौ. येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सध्या आजारी असल्याचे दिसत आहे. या ठिकाणी रुग्णांना सेवा मिळत नाही. उपचाराकडे दुर्लक्ष केल्या जाते. रुग्णांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. वैद्यकीय अधिकारी पूर्णवेळ हजर नसतात. तातडीने उपचार उपलब्ध होत नाही. संपूर्ण परिसरात अस्वच्छता पसरली आहे.
आरोग्य केंद्रात ड्युटी चार्ट कधीही लावला जात नाही. वास्तविक हा चार्ट दर्शनी भागात लावणे आवश्यक आहे. कोण कधी ड्युटीवर आहे हे कळायला मार्ग नसतो. या संबंधी विचारणा केल्यास उलट उत्तरे मिळतात. शुद्ध पिण्याचे पाणीही या ठिकाणी उपलब्ध नाही. येथील निवासस्थानात एक परिचारिका व एक परिचर एवढेच राहतात. अधिकारी मात्र या ठिकाणी राहात नाही. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना तुसडेपणाची वागणूक मिळते. त्यामुळे आधीच त्रस्त असलेला रुग्ण या ठिकाणाहून त्वरित बाहेर पडतो. आवश्यक त्या औषधींचा साठा या ठिकाणी कधीच उपलब्ध राहत नाही. शिल्लक आजारावरही रेफर करण्यावर भर दिला जातो. या सर्व गंभीर प्रकाराकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे. (वार्ताहर)