अरेच्चा..! नोकरीला बोलावले अन् उमेदवारच आले नाहीत; संस्थाचालकच ताटकळत
By अविनाश साबापुरे | Published: August 12, 2023 03:55 PM2023-08-12T15:55:03+5:302023-08-12T15:56:25+5:30
सहा वर्षे लांबलेल्या शिक्षक भरतीत नवा पेचप्रसंग
अविनाश साबापुरे
यवतमाळ : एकीकडे एका जागेसाठी हजारो बेरोजगारांचे अर्ज येत आहेत, तर दुसरीकडे शिक्षक भरती प्रक्रियेत एका जागेसाठी फक्त दहा उमेदवारांना बोलावूनही एकही उमेदवार आलेला नाही. त्यामुळे मुलाखतीसाठी वाट पाहणाऱ्या संस्थाचालकांना शेवटपर्यंत वाटच पाहत राहावी लागली. शुक्रवारी या मुलाखतींचा शेवटचा दिवसही असाच रिकामा गेल्याने संस्थाचालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे धाव घेतली.
राज्य शासनातर्फे पवित्र पोर्टलद्वारे सुरू असलेल्या शिक्षक भरतीमधील हा नवाच ट्विस्ट आता पुढे आला आहे. राज्यात दहा वर्षे बंदी असलेली शिक्षक भरती २०१७ मध्ये सुरू करून त्यासाठी पहिल्यांदाच अभियोग्यता परीक्षा घेण्यात आली. त्यात जिल्हा परिषद शाळांमधील जवळपास पाच हजार जागा भरण्यात आल्या. मात्र, खासगी संस्थाचालक, तसेच काही उमेदवार न्यायालयात गेल्याने अनुदानित संस्थांमधील भरती अडकली होती. हा तिढा सुटून यंदा राज्यातील १९६ शिक्षण संस्थांमधील पदभरतीसाठी पवित्र पोर्टलद्वारे उमेदवारांची शिफारस करण्यात आली. या उमेदवारांची ११ ऑगस्टपर्यंत संस्थाचालकांनी मुलाखती घेऊन, अध्यापन कौशल्याचा डेमो घेऊन नियुक्ती देण्याचे आदेश माध्यमिक शिक्षण संचालकांनी १ ऑगस्टलाच दिले होते.
त्यानुसार एका जागेसाठी शिफारस झालेल्या दहाही उमेदवारांशी संस्थाचालकांनी, मुख्याध्यापकांनी ई-मेल पाठवून संपर्क केला. मुलाखतीचा दिवस ठरवून दिला. मात्र, अनेक संस्थांमध्ये मुलाखतीला एकही उमेदवार आला नाही. अशा संस्थांनी परत व्हाॅट्सॲपद्वारे, प्रत्यक्ष फोन काॅल करून उमेदवारांना बोलावले, तरीही कोणी आले नाही. त्यामुळे अशा संस्थांमधील जागा आता भरल्या जातील की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शुक्रवारी अखेरच्या दिवशी वाट पाहून थकलेल्या संस्थाचालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे तोडगा काढण्यासाठी धाव घेतली.
या शाळांना पाहावी लागली वाट
१) मारेगाव तालुक्यातील शाळेत ७ ऑगस्टला शिक्षक पदभरतीकरिता मुलाखती आयोजित केल्या होत्या. मात्र एकही उमेदवार उपस्थित झाला नाही.
२) घाटंजी येथील नामवंत शाळेतही ७ ऑगस्टला पाच पदांसाठी मुलाखती झाल्या; परंतु ईडब्ल्यूएस प्रवर्गातील एकही उमेदवार आला नाही. यामुळे ११ ऑगस्टला पुन्हा मुलाखत आयोजित करण्यात आली. दिवसभर संबंधित उमेदवाराशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला.
३) महागाव तालुक्यातील एका मोठ्या शिक्षण संस्थेतही ७ ऑगस्टलाच मुलाखती आयोजित केल्या होत्या. तिथेसुद्धा एकही उमेदवार आला नाही.
४) या सर्वच शाळांच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधला असता आम्ही याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांना अवगत केल्याचे ‘लोकमत’ला सांगितले.
असे का घडले?
२०१७ मध्ये अभियोग्यता परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर नोकरीच्या काॅलसाठी उमेदवारांना तब्बल २०२३ पर्यंत वाट पाहावी लागली. या सहा वर्षांच्या कालावधीत अनेक उमेदवार विविध खासगी नोकऱ्यांमध्ये गुंतले. काहींनी आपला स्वत:चा छोटासा का होईना व्यवसाय सुरू केला. यवतमाळच्या संस्थांसाठी चक्क सोलापूर, सांगली, मिरजसारख्या दूरच्या ठिकाणी असलेल्या उमेदवारांची शिफारस झाली आहे. हे उमेदवार यवतमाळऐवजी आपल्या गावाजवळ असलेल्या संस्थांमध्ये मुलाखतीला गेले असण्याची शक्यता आहे. २०१७ मध्येच अनेक उमेदवार ‘एजबार’ होण्याच्या उंबरठ्यावर होते. अशा विविध कारणांमुळे २०१७ मध्ये झालेल्या परीक्षेमधील उमेदवार २०२३ मधील मुलाखतींना गैरहजर राहिल्याची शक्यता आहे.
आता पुढे काय होणार?
पवित्र पोर्टल आणि संस्था लाॅगीनवरच याबाबतची संपूर्ण माहिती असते. ज्या संस्थांमध्ये उमेदवार आले नाहीत, त्यांनी पवित्र पोर्टलमार्फत मेल केल्यास त्यावर उपाय सुचविला जाऊ शकतो. कदाचित अशा संस्थांना मुलाखती घेण्यासाठी आणखी मुदतवाढही मिळू शकते. ज्या उमेदवारांना दूरवरून मुलाखतीला येणे शक्य नाही, त्यांना ऑनलाइन मुलाखत देण्याची सुविधादेखील दिली जाऊ शकते, असे माध्यमिक शिक्षणाधिकारी डाॅ. जयश्री राऊत यांनी सांगितले. त्याचवेळी अतिरिक्त शिक्षकांचे अशा जागांवर समायोजन केले जाण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे.