आईला फोन करून डोहात उतरला, मृतदेहच हाती आला

By सुरेंद्र राऊत | Published: August 11, 2024 07:07 PM2024-08-11T19:07:48+5:302024-08-11T19:07:56+5:30

किटा कापरातील डोहात बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू, दोघे बचावले

Called mother and dive into pond, dead body found | आईला फोन करून डोहात उतरला, मृतदेहच हाती आला

आईला फोन करून डोहात उतरला, मृतदेहच हाती आला

यवतमाळ: शहरालगतच्या चौसाळा टेकडी परिसरातील किटा कापरा शिवारात गिट्टी खदान जवळ पाण्याच्या प्रवाहाने धबधबा तयार झाला आहे. या ठिकाणी अनेकजण पावसाळ्यात मौजमस्तीसाठी जातात. रविवार सुटीचा दिवस असल्याने बालाजी सोसायटी महादेवनगर परिसरातील चार मित्र या धबधब्यावर पोहोचले. तेथे गेल्यानंतर तिघांना पोहोण्याचा मोह आवरला नाही. पाण्यात उतरण्यापूर्वी त्यातील एकाने आपल्या आईला फोन करून याची माहिती दिली. व नंतर डोहात उडी घेतली. मात्र तो यातून बाहेर आलाच नाही. त्याचा मृतदेहच हाती लागला.

श्याम सुनील जोशी (१६) रा. महादेवनगर यवतमाळ असे मृताचे नाव आहे. श्याम हा त्याच्या इतर तीन मित्रांसोबत किटा कापरा येथील धबधब्यावर पोहोचला. त्याच्यासोबत ऋषिकेश मनोज गडीकर, पार्थ याेगेश भांदककर व मंदार बोरकर होते. चौघेही धबधब्यावर आनंद लुटत असताना अचानक त्यांना धबधब्याखाली असलेल्या डोहात पोहोण्याचा मोह झाला. ऋषिकेश याला पोहणे नसल्याने तो काठावरच बसून राहिला. पार्थ, मंदार व श्याम तिघे पाण्यात उतरले. पाणी खोल असल्याने त्यांना अंदाज आला नाही. तिघेही गटांगळ्या खाऊ लागले.

पार्थ व मंदार कसे तरी बाहेर पडले. श्यामला यातून निघता आले नाही. मित्रांच्या समक्षच तो पाण्यात बुडाला. ही घटना सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. तातडीने मदतीची याचना करण्यात आली. रविवार असल्याने हा परिसर गजबजलेलाच होता. धावपळ सुरू झाली. साधन नसल्याने तातडीने श्यामला पाण्याबाहेर काढता आले नाही. या घटनेची माहिती ग्रामीण पोलिस व तहसीलदार डॉ. योगेश देशमुख यांना मिळाली. त्यांनी लगेच आपत्ती निवारण कक्षाचे पथक घटनास्थळी पाठविले. या पथकानेही तब्बल तीन तास श्यामचा पाण्यात शोध घेतला. त्यांना मृतदेह मिळाला नाही.

कापरा येथील युवकाने शोधला मृतदेह
अखेर किटा कापरा येथील प्रदीप प्रल्हाद बोरकर हा धाडसी तरुण मदतीला पुढे आला. त्याने स्वत: डोहात उडी घेऊन शोधकार्य सुरू केले. जे प्रशिक्षित आपत्ती व्यवस्थापन पथकाला जमले नाही, ते काम गावच्या धाडसी युवकाने केले. श्यामचा मृतदेह दुपारी ४ वाजता पाण्याबाहेर काढण्यात यश आले.

पावसाळी पर्यटन जीवावर बेतणारे
यवतमाळ शहरालगत अनेक निसर्गरम्य ठिकाण आहेत. अशा ठिकाणी गेल्यानंतर जीव धोक्यात घालण्याचे धाडस केले जाते. काहींना रिल्स तयार करायची असते तर काहींंना फोटो घ्यायचे असतात. या नादात आपण जीवाशी खेळतोय याचेसुद्धा भान राहत नाही. धबधबे, प्रकल्प, नदी-नाले येथे तयार झालेले डोह अशा ठिकाणी स्वत:ला सुरक्षित ठेऊनच आनंद घेतलेला कधीही सुखदायी ठरतो. अन्यथा कुटुंबाचे मोठे नुकसान होते.

 

Web Title: Called mother and dive into pond, dead body found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.