बछड्यांचा मृत्यू झाला, तेथेच आढळले वाघिणीच्या पायाचे ठसे...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2024 06:11 PM2024-02-02T18:11:55+5:302024-02-02T18:12:30+5:30
तीन पिलांची आई, एक बछडा वाघिणीसोबतच
संतोष कुंडकर, वणी (यवतमाळ) : वणी वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या सुकनेगाव जंगलातील तलावाजवळ तिन पिलांची आई असलेल्या वाघिणीच्या दोन पिलांचा भुकेने व्याकूळ होऊन मृत्यू झाला. गुरूवारी उजेडात आलेल्या या घटनेनंतर वन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मोठा ताफा गुरूवारपासून या परिसरात डेरा ठोकून आहे.
दोन बछड्यांच्या मृत्युपूर्वी वाघिण पिल्लांपासून दूर गेली होती. ती नेमकी कुठे गेली, याचा शोध घेत असताना शुक्रवारी सर्चींग ऑपरेशन दरम्यान, तलावाच्या वरच्या बाजुला वाघिण व बचावलेल्या तिच्या बछड्याच्या पायाचे ठसे आढळून आलेत. त्यामुळे वनविभागाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. घटनास्थळावर वणीचे सहाय्यक वनसंरक्षक पांढरकवडा वन विभागाचे उपवनसंरक्षक किरण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शंकर हटकर, आरएफओ प्रभाकर सोनडवले, मुकूटबनचे आरएफओ तुळशीराम साळुंखे, पारवा आरएफओ मनिष पवार, वणीच्या आरएफओ (ईजीएस) वंदना धांडे, यवतमाळचे मानद वन्यजीव रक्षक श्याम जोशी यांच्यासह ७० ते ८० अधिकारी कर्मचाऱ्यांचा ताफा वाघिणीच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहे.
सुकनेगावच्या जंगलातील महसूलच्या जंगलात असलेल्या तलावाच्या काठावर बुधवारी सकाळी वाघिणीचा एक मादी बछडा मृतावस्थेत आढळून आला होता. या घटनेवरून २४ तास उलटत नाही, तोच गुरूवारी दुसऱ्या दिवशी तलावापासून काही अंतरावर दुसऱ्या एका मादी बछड्याचा मृतदेह आढळून आला होता. हे दोनही बछडे अडीच ते तीन महिने वयाचे होते. या घटनेनंतर वनवर्तुळात चांगलीच खळबळ उडाली. घटनेच्या दोन दिवस आधीपासून वाघिण या दोन बछड्यांसोबत नव्हती. त्यामुळे ती नेमकी गेली कुठे, या प्रश्नाने वनविभाग अस्वस्थ होता. या वाघिणीचा शोध घेण्याचे मोठे आव्हान वनविभागापुढे होते. गुरूवारी या वाघिणीच्या शोधार्थ वनविभागाने पाच पथकांचे गठण केले. या पथकांनी गुरूवारी रात्रभर सुकनेगाव जंगलात सर्चिंग ऑपरेशन राबविले. मात्र वाघिण कुठेही आढळून आली नाही. शुक्रवारी सकाळी मात्र तलावाच्या वरच्या भागात वाघिण आणि तिच्या एका बछड्याच्या पायाचे ठसे आढळून आले. त्यामुळे वनअधिकाऱ्यांचा जीव भांड्यात पडला.
वाघिणीला प्रत्यक्ष पाहण्यासाठी अधिकारी तळ ठोकून
वाघिणीच्या पायाचे ठसे आढळून आले असले तरी तिला प्रत्यक्ष पाहून खातरजमा करण्यासाठी शुक्रवारी रात्रभर वन विभागाचा ताफा तलावाच्या काठावर सुरक्षित अंतरावर तळ ठोकून असणार आहे. रात्रीच्यावेळी ही वाघिण तिच्या एका बछड्यासह पाणी पिण्यासाठी येईल, अशी वनअधिकाऱ्यांना आशा आहे. तलावाच्या वरच्या भागात ठसे आढळून आले असले तरी वनविभागाने तलावाच्या काठावर लावलेल्या कॅमेऱ्यात वाघिण ट्रॅप झाली नव्हती.